Advertisement

मुंबई हायकोर्टाने 19 फेब्रुवारीचा ड्राय डे उठवला, 23 तारखेला निकाल लागेपर्यंत दारूबंदी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 2:10 PM IST
मुंबई- राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या काळात लागू करण्यात आलेला 19 फेब्रुवारीचा ड्राय डे (दारूबंदी) मुंबई हायकोर्टाने उठवला आहे. मात्र, 20, 21 आणि 23 फेब्रुवारी अर्थात निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अर्थात सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्राय डे लागू राहील, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (16 फेब्रुवारी) झाले. दुसर्‍या टप्प्यात 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहेत. यात महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी मतदान होईल. 23 फेब्रुवारीला तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जानेवारीमध्ये  अधिसूचना जारी केली होती. निवडणुकीच्या काळात अर्थात 19, 20, 21, आणि 23 फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली होती. या संदर्भात महसूल विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले होते. राज्यसरकारच्या ड्राय डेच्या आदेशाच्या विरोधात ठाण्यातील हॉटेल मालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. निवडणूक काळातील ड्राय डे जाचक आणि बेकायदा असल्याचे संघटनेने म्हटले होते. दारुबंदीचा नियम केवळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला लागू आहे, असा दावा याचिकार्त्यांनी केला. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

हायकोर्टाने 19 फेब्रुवारीचा ड्राय डे रद्द केला आहे. मात्र, 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम ठेवला आहे. तसेच 23 फेब्रुवारीला संपूर्ण दिवसाचा ड्राय डे उठवत, 5 वाजेपर्यंत म्हणजेच निकाल लागेपर्यंत लागू केला आहे.

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow