Advertisement

राज ठाकरे व मनसेच्या वरिष्ठ नेत्यांत खडाजंगी, बैठकीत नेत्यांचे परखड ‘चिंतन’

विशेष प्रतिनिधी | Apr 21,2017 7:33 AM IST
मुंबई - महापलिका निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यासाठी राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत चक्क राज व पक्षाच्या नेत्यांतच खडाजंगी झाली. गेला महिनाभर मनसेचे नेते विभागवार पराभवावर चिंतन करत आहेत. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने कातवलेल्या नेत्यांनी गुरूवारी थेट राज ठाकरेंना परखड शब्दांत आपली मते ऐकवली.  
 
नुकत्याच झालेल्या राज्यातील दहा महापालिकांत मनसेचे पानिपत झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून मनसेत पराभवाचे चिंतन प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी दोन तास चाललेल्या या बैठकीत नेत्यांनी चिंतन बैठकांत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली मते राज ठाकरे यांच्या कानावर घातली.

सोबतच अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर तुमच्याकडून अधिकृत भूमिकाच येत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होत असल्याची बाबही नेत्यांनी राज यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मी भूमिका मांडतो, पण तुम्हीच माझी भूमिका जनतेपर्यंत पोहाेचवण्यात कमी पडत आहात, असे राज यांनी सुनावले.  
 
मराठीच्या मुद्द्यावरून मतभेद : आता आपण मराठी माणसासोबतच अन्य भाषिकांनाही जवळ केले पाहिजे,अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मनसे नेत्यांनी राज यांना कळवले. त्यावर मी मराठीचा मुद्दा असा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते दिली नाहीत तरी चालतील, असे राज यांनी नेत्यांना सुनावल्याचे कळते.
RECOMMENDED FOR YOU