Loading...

शिर्डीतून नव्हे, आता मध्य मुंबईतून लढणार; मंत्री रामदास आठवले यांनी केले स्पष्ट

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार होता. पण आता मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Divya Marathi Sep 12, 2018, 12:05 IST

नगर- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार होता. पण आता मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी तसे स्पष्ट केले. 


पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदार संघातून आठवले यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती, पण त्यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये वाकचौरे पराभूत होऊन शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत. आगामी निवडणुकीत आठवले पुन्हा साईंच्या नगरीतून निवणूक लढवणार असल्याची चर्चा होती. याबाबत पत्रकार परिषदेत आठवले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आठवले म्हणाले, लोकसभा निवडणूक शिर्डीतून लढवण्याचा निर्णय होता, पण आता मत बदलले आहे. दक्षिण मध्य मुंबईत मी निवडणूक लढवणार आहे. यापूर्वी या मतदारसंघातून मी विजयी झालो होतो. शिवसेना व भाजप युती झाली तरी हा मतदार संघ माझ्यासाठी सोडावा लागेल. आणि शिवसेनेबरोबर युती झाली नाही, तरी भाजप रिपाइं युतीच्यावतीने ही जागा मी लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 


देशात पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारने कर कमी केले, तर दर कमी होतील. काँग्रेस व राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याकडे आठवले यांनी लक्ष वेधले. अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध होतो आहे, हा कायदा बदलण्याची किंवा त्यात दुरुस्तीची मागणी केली जात आहे. पण या कायद्यात बदल होणार नाही. परंतु, कायद्याचा गैरवापर करू नये, यामध्ये मी लक्ष घालणार आहे. दलितांवर अत्याचार करू नका, बंधु भावाने सर्वांनीच राहावे. मराठा आरक्षणाला आमचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. यासाठी आरक्षण मर्यादा २५ टक्क्यांनी वाढवून ती ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. यासाठी कायदा करावा लागणार आहे. मराठा दलित वितुष्ट दोन्ही समाजाच्या हिताचे नाही, निवडून येण्यासाठी एकमेकांच्या मतांची गरज असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी विधानसभा व लोकसभा एकाचवेळी घेण्याची भूमिका घेतली आहे, पण हे महाराष्ट्रात तरी शक्य नाही. 


दलित अत्याचाराच्या विषयाला राजकीय रंग कोणीही देऊ नये. समाजात अजुनही जातीयवाद जिवंत अाहे, म्हणून अत्याचार होणार नाहीत, याची सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहनही आठवले यांनी केले. 


Loading...

Recommended


Loading...