आपली आपल्याला वाट सापडेपर्यंतचा प्रवास खूप खडतर असतो. स्वभावातले बंड उसळ्या मारत असते. बेफिकिरी, बेपर्वाई टोक गाठून असते. आसपासच्या सगळ्यांनीच खोल दरीत आपला शेवट गृहीत धरलेला असतो. पण केवळ प्रकाशवाट दाखवणाराच नव्हे, तर जगणं शिकवणारा शिक्षक ढाल होऊन आयुष्यात येतो आणि मातीमोल आयुष्याचं सोनं होऊन जातं...
अत्यंत व्रात्य मुलगा म्हणून मी गल्लीत, गावात, शाळेत, नातेवाइकांत कुख्यात होतो. चंचल मनोवृत्तीचा हा मुलगा हळूहळू वाया जात आहे या निष्कर्षाप्रत तमाम लोक आले होते. एक वाया गेलेला मुलगा अशी माझी सर्वदूर कीर्ती पसरली होती. फुलांचा सुगंध सुवार्ता पसरवतो. माझं अस्तित्व कुवार्ता पसरवत असे. माणसाच्या आयुष्यात सकारात्मक जडणघडण क्वचितच आपोआप घडते, बव्हंशी टक्केटोणपे, ठेचा खाल्ल्याशिवाय माणूस घडत नाही.
शाळेत मी नाना हरकती, टवाळ्या करायचो. वर्गातल्या मुलामुलींची खोड काढणे, त्यांना जिव्हारी लागेल असे चिडवणे, खडूचे तुकडे पाठमोऱ्या गुरुजींना फेकून मारणे, हे कुणी केले, हे ओरडून सरांनी विचारताच जो कोणी/जी कोणी माझे नाव सांगेल, त्या सहाध्यायीला शाळा सुटल्यावर बडवबडव बडवणे, त्यांचे पालक मुख्याध्यापकाकडे तक्रार घेऊन आल्यावर सपशेल शरणागती पत्करून तोडपाणी करणे... हे सर्व मी केले आहे.
शाळेत एकदा दुसऱ्याच तासाला कंटाळा आला म्हणून मी वर्गातून बाहेर पडलो अन् सरळ शाळेची घंटा वाजवून शाळा सोडून दिली. हाहाकार माजला. सगळे मास्तर दारात उभे राहिले तरी सगळी मुलं त्यांच्या अंगाखांद्याशी झगडून फरार झाली. माझ्या गुन्ह्यास प्रत्यक्ष साक्षीदार शाळेचा चपराशी मोहन हा होता. सफरचंद कापायचा एक छोटा चाकू (क्लास्प नाइफ) माझ्या सतत खिशात असे. तो उघडून मी (वय वर्षं तेरा) मोहनला हाग्या दम भरला. म्हटलं, "याद राख, माझं नाव सांगितलंस तर.’ तो मौन झाला. मुख्याध्यापकांच्या कोर्टात त्याने साक्ष दिली नाही. मग मी रमतगमत निश्चिंत घरी आलो.
दारातच वडिलांनी धुलाई सुरू केली. इतकं बेदम मारलं की त्यांचा हात सुजला, मग काठी तुटली, त्यांच्या डोळ्यातला अंगार विझत नव्हता, आई थरथर कापत होती. अंगणात हे निर्दय कृत्य घडले. तेवढ्यात मला कोपऱ्यात आमचे मुख्याध्यापक दिसले. मी जमिनीवर पालथा पडलो होतो. तोंडातून आवाज निघत नव्हता. अचानक वडिलांनी बागेतली एक गुलाबाची कुंडी उचलून डोक्यावर घेतली अन् बदकन माझ्या पाठीवर फेकून मारली! माझे डोळे पांढरे झाले. पण त्या अवस्थेत मुख्याध्यापक ‘मु.घ. कुलकर्णी सर' तीरासारखे धावत आले, अन् माझा देह त्यांनी झाकला. "अहो, बास झालं! मारून टाकता काय पोराला!’ असं ते अत्यंत क्रुद्ध स्वरात ओरडले, वडिलांनी उचललेली दुसरी कुंडी रागाने फेकून दिली. पाय आपटत ते गेले. सरांनी मला उचलले, अंगणातल्या विहिरीवर नेले, आईने जखमा धुतल्या. हळद लावली. सर निघून गेले.
मी चार दिवसांनी शाळेत जाण्यायोग्य झालो. मुख्याध्यापकांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं. मी कोपऱ्यात थरथर कापत उभा होतो. काळेभोर कुरळे केस, भव्य कपाळ, जाड फ्रेमचा जाड भिंगाचा त्यांचा चष्मा, शुभ्र पांढरा हाफ शर्ट, ग्रे रंगाची कडक इस्त्रीची पँट अन् काळ्याकुळकुळीत चकाकणाऱ्या चपला. दोन्ही कोपरं टेबलवर टेकवून हाताच्या ओंजळीत चेहरा ठेवून सर भेदकपणे माझ्याकडे बघू लागले. पाहतापाहता त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ हसू उमलले.
"विवेकबुवा, तुम्ही निष्णात खोडकर चिरंजीव आहात, तुमचे काय करावे, हा माझ्यापुढे यक्षप्रश्न आहे. असं बघा, तुम्हाला साहित्यात रुची आहे, विज्ञानात गती आहे, खोडकर मती आहे. पण हे सर्व माती आहे. ज्याला भविष्याचा अंदाज घेता येत नाही, आपल्याला काही बनायचे आहे, समाजात स्थान मिळवायचे आहे, याची ज्याला जाणीव नाही अशा व्यक्तीचे जीवन मातीमोल आहे. सर्व शिक्षकांची, पालकांची, इतकंच काय, तुमच्या पिताश्रींची शिफारस आहे की तुम्हाला शाळेतून काढण्यात यावे. बोला! काय करू?’
मी त्यांचे पाय धरून घळघळा रडलो, माफी मागितली. मला माहीत होतं, हे ‘मु.घ.सरच' माझं भवितव्य निश्चित करणार. सर म्हणाले, "जा, मला स्वच्छ ग्लासभर पाणी आणून पाज, लक्षात ठेव, त्या पाण्यात एक जरी कचऱ्याचा कण दिसला तरी मी म्हणेन तुझं मन अशुद्ध आहे, तू क्षमायोग्य नाहीस.’ शाळेच्या चौकात मी सगळ्या वर्गातून उत्सुकतेने डोकावणाऱ्या मुलामुलींसमोर स्टीलचा ग्लास राख टाकून नारळाच्या करवंटीने खसखसून घासला, तीन-चारदा विसळला. मग रांजणातलं गार पाणी त्यात भरून दबक्या पावलाने ग्लासाचा तळ शोधत सरांच्या समोर गेलो, ग्लासात पाहत म्हणालो, "सर, कणभरही कचरा नाही, तुम्ही पाहा!’
सर पाहतच होते, त्यांनी ग्लास टेबलवर ठेवला. उठले. समोर आले. मला पोटाशी धरलं, मी अश्रूंना वाट करून दिली. आपल्या स्वच्छ परीटघडीच्या शुभ्र रुमालाने त्यांनी माझे डोळे पुसले. ग्लास हाती दिला, म्हणाले, "पी ते पाणी आणि वर्गात जाऊन बस.’ परत फिरताना माझे वडील मला दारात दिसले, ते घृणेने माझ्याकडे बघत होते. सर त्यांना म्हणाले, "काळजी करू नका, विवेक निर्मळ झालाय! जा तुम्ही घरी, फक्त एक विनंती आहे, याला मारू नका आता, त्याची गरज उरली नाही.’ ते माझे पूज्य मु.घ.कुलकर्णी सर माझ्या अन् माझ्या वडिलांच्या ताणलेल्या नात्यातला ‘दुवा' झाले नसते तर... मी आज कोण असतो, काय झालो असतो याची कल्पना करू शकत नाही मी. सरांची शाबासकी मी अनेकदा मिळवली. डॉक्टर झालो. सुवर्णपदक मिळवलं तेव्हा शाळेत सरांनी माझा हृद्य सत्कार केला. मी हा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांना प्रांजळपणे कथन केला. अशा कित्येक बिघडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची साखळी मजबूत करण्यात माझे मु.घ. सर हा भक्कम दुवा! म्हणूनच किती तरी विद्यार्थी, पालक आणि समाज त्यांना दुवा देतात.
लेखकाचा संपर्क : ९८२२०६४१७०
drvivekdeshpande@gmail.com