अकोला- मी सनातनचा साधक बोलतो, तीन दिवसात तुला जिवाने मारून टाकू, अशा धमक्यांचे फोन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जगतराव जायले यांना आले. त्यावरून शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पंकज जगतराव जायले ( वय ४०, गोरक्षण रोड अकोला) हे त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्या मोबाइलवर फोन आला. मी सनातनचा साधक असून माझे कोणीच काही बिघडवू शकत नाही. तुला तीन दिवसात जीवाने मारले नाही तर सनातनचा साधक नाही, असे सांगत आहे.
महामानवांविरूद्ध अश्लील भाषा वापरून जातीय तेढ निर्माण करत असल्याने पंकज जायलेंनी शहर कोतवाली ठाण्याशी संपर्क साधला. यावरून त्यांनी जबानी रिपोर्ट दिला असून त्यावरून तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना १० सप्टेंबरला निवेदन देणार आहे. जायलेंच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करणार आहे. गैरअर्जदाराने सनातनचा साधक असल्याचे सांगितले तरी तो खरेच सनातन संस्थेचा साधक आहे का, हे तपासात समोर येणार आहे. पंकज जायले हे संभाजी ब्रिगेडचे वैचारिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.
मोबाइल नंबरवरून चौकशी करू
पंकज जायले यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ज्या मोबाइल नंबरवरून धमकी आली, त्यानुसार तपास सुरु केला आहे.
- विलास पाटील, ठाणेदार सिटी कोतवाली, अकोला.