Loading...

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणारे पुणे विद्यापीठ देशातील पहिलेच

'देशभरात सौरऊर्जेचा वापर करणारे पहिलेच विद्यापीठ म्हणून 'ग्रीन एनर्जी मिशन'मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढ

Divya Marathi Sep 07, 2018, 07:41 IST

पुणे- 'देशभरात सौरऊर्जेचा वापर करणारे पहिलेच विद्यापीठ म्हणून 'ग्रीन एनर्जी मिशन'मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला याचा अभिमान वाटतो. एकूण चौदा इमारतींवर आता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यामधील पहिल्या टप्प्यात ६ इमारतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे,' अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज सौरऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते. 


विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत ६०२ किलोवॅट पीट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज पाहिले जात आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे संचालक डॉ. संदेश जाडकर म्हणाले की, या प्रकल्पासाठी विद्यापीठ आवारातील सर्व इमारतींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधील १४ इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील सात इमारतींवर हा प्रकल्प २० सप्टेंबर २०१८ पर्यंत कार्यान्वित केला जाईल. 


प्रकल्पाची वैशिष्ट्ये 
- अक्षय आणि नवीकरणक्षम ऊर्जा विभागाच्या वतीने विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत हा एकूण ६०२ किलोवॅट पीट क्षमतेचा प्रकल्प 
- केंद्र शासनाच्या सेकी - सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम क्लीनमॅक्स या कंपनीला देण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरवले. 
- या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च क्लीनमॅक्स कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. 
- यामध्ये पहिल्या टप्प्यात विधी विभाग, सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन, आंबेडकर भवन, जयकर ग्रंथालय, कॅप भवन, डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी या इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. 
- या प्रकल्पामुळे विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील ३५.५ लाख इतक्या रकमेच्या विजेची दरवर्षी बचत होणार आहे. यामधून अंदाजे ८ लाख ७२ हजार ९०० किलोवॅट ऊर्जा वाचेल. 
- पुढील २५ वर्षांसाठी प्रतिवर्ष ७१६ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास साहाय्य मिळणार आहे. कमी होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे १७ हजार ४२० इतक्या वृक्षांची लागवड करण्यासारखेच आहे. 


Loading...

Recommended


Loading...