Loading...

माहेरवाशिणींचा ‘बोरीचा बार’

केवळ महिलांना स्वत:ला व्यक्त करता यावे, गावातल्या सासुरवाशिणींना माहेरी यायला मिळावे

Divya Marathi Sep 04, 2018, 05:29 IST

केवळ महिलांना स्वत:ला व्यक्त करता यावे, गावातल्या सासुरवाशिणींना माहेरी यायला मिळावे, यासाठी सातारा जिल्ह्यातील सुखेड आणि बोरी गावांमध्ये भरणाऱ्या शिव्यांच्या यात्रेला जाऊन तिथल्या उत्साही वातावरणाची अनुभूती देणारी कव्हर स्टोरी


पुण्यातनं स्वारगेटवरून सातारा जिल्ह्यातल्या खंडाळ्याला जाणारी एसटी पकडून आम्ही तिघेजण निघालो. पावसाची रिपरिप चालूच होती. सकाळी लवकर निघाल्यामुळे एसटीत फार गर्दी नव्हती. पुणे सोडताच एसटीने वेग घ्यायला सुरुवात केली. एसटीच्या खिडकीतून बाहेर नजर जाईल तिथपर्यंत हिरव्या डोंगररांगा दिसत होत्या. खिडकीतून येणारा गार वारा झोंबत होता. तिकीट काढून झाल्यानंतर अनेक प्रवासी गार हवेमुळे पेंगुळले होते. खिडकीतून बाहेर बघत असतानाच मध्येच खिडकीतील वरच्या बाजूला पावसामुळे ओघळून आलेले पावसाचे थेंब चेहऱ्यावर पडून विचारांची तंद्री भंग करत होते. गाडीच्या वेगाबरोबर विचारांचा वेगही वाढत होता. या सगळ्यात गाडी खंडाळ्याच्या स्टँडवर कधी थांबली ते कळलंच नाही. तिथे उतरून आम्ही पुन्हा सुखेड फाट्यामार्गे जाणारी दुसरी एसटी पकडली आणि आमचा ‘बोरीच्या बारा’कडचा खरा प्रवास सुरू झाला.


खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी ही दोन गावे गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा ‘बोरीचा बार’साठी प्रसिद्ध आहे. बोरीचा बार म्हणजे ‘शिव्यांची यात्रा’ किंवा ‘वादावादीची यात्रा’ होय.


एसटीने सुखेड फाट्यावर उतरून आम्हाला न्यायला आलेल्या घरच्या गाडीने आम्ही निघालो. वेशीवरून गावात जाता असताना सुरू होणाऱ्या वढ्याच्या अलीकडेच अस्सल जत्रेचं वातावरण निर्माण करणारी दुकाने उभारण्याची तयारी सुरू झाली होती. पाळणे, शेव-चिवडा, रेवडी, जिलबीची दुकाने उभी राहत होती. गावात शिरताच जिल्हा परिषद शाळेपासून आता जाताना अलीकडच्या काळात स्टेटस बनलेले ‘बोरीच्या बारासाठी आलेल्या सर्व पै-पाहुण्याचे हार्दिक स्वागत’ यासारखे अनेक फलक लक्ष वेधून घेत होते. तिथून आम्ही घरी पोचलो. चहापाणी घेऊन आम्ही बार भरणाऱ्या वढ्याच्या ठिकाणाकडे निघालो. सगळीकडे पावसाळा सुरू झाला असला तरी इकडे मात्र वढ्याला पाणी येईल इतकाही पाऊस नव्हता. ओढा कोरडाठाण होता. वढ्यावर असणाऱ्या छोट्या पुलावरून आम्ही जात असताना दोन म्हातारी माणसं बोलत उभी होती. त्यांच्याजवळ जाऊन आम्ही नेमका बार किती वाजता सुरू होईल याची चौकशी केली तेव्हा त्यातील एक म्हातारबाबा म्हणाले, ‘आता बगा तयारी तर झालीच आहे. बारा साडेबाराच्या ठोक्याला बराबर बघा बारला सुरवात हुइल.’ ‘तुम्ही कोणत्या गावाच्या पावणी,’ असं शेजारी उभ्या असलेल्या म्हातारबाबांनी विचारलं. आमच्याबद्दल विचारतात असं दिसताच, आम्ही पुढं सरकत त्यांच्या जवळ जात आमची माहिती दिली. अन वेळ न दवडता बार नेमका कधी सुरू झाला याविषयी विचारलं. तेव्हा ते म्हातारबाबा म्हणाले, ‘आता साल का ध्यानात ऱ्हातया व्हय पण, माझ्या आज्याच्या काळाच्या आधीपसनं चालू हाय ह्यो बार.’ 
आम्ही म्हणालो, ‘पण असला कसला शिव्याचा बार?’


म्हातारबाबा, ‘अरं पोरांनो आमासनी काय लय कळत नाय बघा, पण ह्यो बार करायाला लागतो एवढं खरं. त्या निमित्ताने सासरवासणी पोरीबाळी येत्यात, दोन दिस ऱ्हात्यात. लोकांच्या गाठीभेटी व्हत्यात यवढं मात्र खरं आहे.’ त्या दोन म्हाताऱ्यांचा निरोप घिऊन आम्ही बार भरणाऱ्या ओढ्याच्या पात्राच्या दिशेने निघालो. बार बघण्यासाठी बायामाणसांची गर्दी वाढत होती. बाराच्या बंदोबस्तासाठी तालुक्याच्या ठिकाणाहून पोलिस दलातील ४०-५० पोलिसांची कुमक बार पाहणी करत होती. वढ्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणावर खेळणी, पाळणे, जिलबी, भेळ, भजी, संसाराेपयोगी वस्तूंची दुकानं उभी राहिली होती. वढ्याच्या भवतीने हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली. बाहेरगाववरून आलेली बायामाणसं जत्रेसाठी उभारलेल्या दुकानात फिरून वढ्याकडं आपला मोर्चा वळवत होती. जास्तीचा पाऊस झाला नसला तरी थोड्याशा बुरगांटानं खुरट्या गवताला पालवी फुटल्यामुळे वढ्याच्या बाजूचा परिसर हिरवागार दिसत होता. वढ्याच्या कडंच्या गर्दीचा ओघ वाढत होता, कोरड्या वढ्याच्या कडंला माणसांची पांढर व्हायला लागली व्हती. बाराची वेळ झाली होती. 


तेवढ्यात वढ्याच्या पलीकडच्या बाजूनं सुखेड गावाकडून हलगी वाजवत, शिंग फंुकत, ढोल वाजवत पुरुष आणि त्यांच्या मागे बायका हातवारे करत पळत येत होत्या. बायका जवळ येईपर्यंत काही कळले नाही. दुसऱ्या बाजूनेदेखील अशाच पद्धतीने बायका पळत आल्या. दोन्हीकडच्या बायका वढ्याच्या बाजूला येऊन एकमेकींकडे हातवारे करून जोरजोरात शिव्यांची लाखोली वाहू लागल्या. हातवारे करत, टपोऱ्या डोळ्यातील राग, शरीरातील होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून मनात साठलेल्या व्यक्ती, वस्तूंचा असंख्य शिव्यांतून उद्धार करत होत्या. दोन्ही बाजूंना पोलिसांनी हाताची साखळी करून बायकांना अडवले होते. मात्र त्वेषाने एकमेकींना शिव्या देणाऱ्या बायकांना आवर घालणे पोलिसांना अवघड होत होते. वढ्याच्या मध्यमागी पोलिस, गावकरी आणि वाजवणारे होते. वाद्यांचा आवाज, लोकांचा गोंधळ, यात बायका देत असलेल्या शिव्या त्यांच्याजवळ गेल्याशिवाय फारशा ऐकू येत नव्हत्या. वढ्याच्या दोन्ही बाजूंनी बायकांनी अगदी शिव्यांची राळ उठवली होती. शिव्यांच्या माध्यमातून मनात साठलेला राग, होणारी व झालेली घुसमट बाहेर पडत होती. सुरुवातीचा बायकांचा दुर्गावतार अवतार हळू नॉर्मल होत होता. या पद्धतीने अर्धा एक तास अगदी वाजतगाजत शिव्यांचा सोहळा सुरू होता. 


हळूहळू दोन्ही गावच्या ज्येष्ठांनी आपल्या बायकांना मागे ढकलत बाजू करण्यास सुरुवात केली. पोलिसांनीही आता थांबावं, असं आवाहन केलं. आणि हळूहळू बोरीचा बार पांगू लागला. अगदी काही वेळापूर्वी एकमेकींना शिव्या देणाऱ्या महिला आता एकमेकींना भेटू लागल्या. एकमेकंच्या तोंडावरून हात फिरवून ख्यालीखुशाली विचारू लागल्या होत्या. बाराचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता. माहेरवाशिणी आपल्या माहेरातल्या माणसांना भेटत होत्या, गळ्यात पडत होत्या. केवळ तरण्याताठ्या नव्हे तर म्हाताऱ्या बायकासुद्धा बोरीच्या बाराला आल्या होत्या. 


पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला बार बघण्यासाठी पंचक्रोशी लुटून आली होती. शिव्यांच्या माध्यमातून मनात साठून राहिलेल्या सगळ्या चांगल्यावाईट गोष्टी बाहेर पडल्या होत्या. मन कसं मोकळं मोकळं झालं होतं. आता वर्षभर काय तरास होणार नव्हता. बाराच्या निमित्ताने पुन्हा पुढच्या वर्षी येणं व्हणार व्हतं. वर्षापासून साठून राहिलेल्या सगळ्या कागाळ्या, अडीअडचणी सोडवता येणार व्हत्या. गुजगोष्टी पुन्हा करता येणार व्हत्या. सख्या, मैत्रिणी भेटणार व्हत्या. दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या ‘बोरीच्या बाराचं’ कोडं कुणाला काही न विचारता आम्हाला उलगडलं होतं. ‘बोरीच्या बारात’ बार घालायला येताना बायकांच्या चेहऱ्यावरील त्रागा अन् बारा घालून झाल्यानंतरची प्रसन्न मुद्रा सगळं काही सांगून गेली होती.

- प्राजक्ता ढेकळे, पुणे
prajaktadhekale1@gmail.com


Loading...

Recommended


Loading...