Loading...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे 'वय' घटले; दोन वर्षांत ३६० जण ठार

सुरक्षा दलांच्या सलग मोहिमांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे 'वय' घटले आहे. गेल्या दोन वर्षांत ३६२ पेक्षा जास्त दहश

Divya Marathi Sep 10, 2018, 08:58 IST

नवी दिल्ली- सुरक्षा दलांच्या सलग मोहिमांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे 'वय' घटले आहे. गेल्या दोन वर्षांत ३६२ पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक (डीजी) राजीव राय भटनागर यांनी ही माहिती दिली. भटनागर यांनी रविवारी मुलाखतीत सांगितले," या वर्षी १४२ दहशतवादी ठार, तर गेल्या वर्षी २२० दहशतवादी ठार झाले होते. सीआरपीएफ, पोलिस, लष्करातील उत्तम समन्वयामुळेच हे शक्य झाले. राज्यात काही दहशतवादी बाहेरचे तर काही स्थानिक युवक शस्त्रे घेऊन त्यांच्यासोबत उभे आहेत. ही संख्या कमी किंवा जास्त असू शकते, पण दहशतवाद्यांचे वय खूप कमी झाले आहे, त्यांचे जीवन मर्यादित झाले आहे, हे आमचे यश आहे. भरती झालेल्या अतिरेक्यांची संख्या भलेही जास्त असली तरी परिणाम मर्यादित आहे. दहशतवाद्यांच्या भरतीचा विशेष परिणाम होत नाही हे त्यावरून स्पष्ट होते. 


खोऱ्यात शस्त्रे घेणाऱ्या युवकांच्या संख्येत वाढ, पण रोखण्याचेही प्रयत्न 
भटनागर म्हणाले, खोऱ्यात दहशतवादी गटांशी जोडले गेलेल्या स्थानिक युवकांच्या संख्येचा आकडा वाढला हे मान्य आहे, पण सुरक्षा दले त्यांना शस्त्रे हाती घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिरेकी ग्लॅमर हे त्यांच्या अतिरेकी होण्याचे कारण आहे. शस्त्रे हाती घेऊन काही साध्य होणार नाही, हा काही काळाचा मुद्दा आहे हे युवकांना समजून घ्यावे लागेल. 


सुरक्षा चौक्या, जवानांचे सुरक्षा कवच झाले मजबूत 
मिश्रांनी सांगितले की, सुरक्षा आव्हाने पाहता सीआरपीएफ जवानांना संपूर्ण शरीराच्या संरक्षणासाठी बचावाची साधने, बुलेटप्रूफ वाहन, विशेष चिलखती वाहनांद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आपल्या जवानांचा स्तर वाढवला आहे. काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या ६० वर तुकड्यांत ६० हजारपेक्षा जास्त जवान तैनात आहेत. निदर्शकांची गर्दी ही आमची चिंता आहे. 


हल्ला करून पळा, ही अतिरेक्यांची रणनीती 
दहशतवादविरोधी मोहिमांच्या यशाचा उल्लेख करताना भटनागर म्हणाले, " अतिरेक्यांच्या प्रमुखांना ठार मारले आहे. खोऱ्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती देशातील इतर राज्यांप्रमाणे नाही कारण दहशतवादी येथे 'हल्ला करा आणि पळा' हा गनिमी कावा वापरत आहेत. अर्थात, आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात परतण्यासाठी शरण येण्यास सांगतो. त्यापैकी काही मुख्य प्रवाहात परतलेही आहेत. 


३५ 'अ'वर एकजूट : आधी फारूक, आता मेहबूबांची निवडणूक बहिष्काराची धमकी 
केंद्र जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३५ 'अ' मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरुद्ध तेथील प्रादेशिक पक्ष एकजूट होत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्लांनी या मुद्द्यावर शनिवारी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या बहिष्काराची धमकी दिली, तर रविवारी माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनीही तसेच वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने ३५ 'अ'शी छेडछाड केली तर आमचा पक्षही राज्यात सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल. भाजप नेते राम माधव यांनी पलटवार केला. ते म्हणाले, फारूक यांनी नेहमीच राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या स्थितीबाबत गंभीर आहेत, पण फारूक त्यांच्या प्रयत्नांत खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांना ३५ 'अ' च्या मुद्द्यावर निवडणुकीवर बहिष्कार घालायचा असेल तर कारगिलच्या निवडणुकांत भाग का घेतला होता, हेही त्यांनी सांगावे. 


Loading...

Recommended


Loading...