Loading...

पश्चिम विदर्भातील ५ हजार प्राध्यापकांचा एकदिवसीय संप; रिक्त जागा भरण्याची मागणी

विद्यार्थ्यांची संख्या तीनशे पटीने वाढली असताना रिक्त पदे भरली जात नसल्याने सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करीत

Divya Marathi Sep 12, 2018, 12:26 IST

अमरावती- विद्यार्थ्यांची संख्या तीनशे पटीने वाढली असताना रिक्त पदे भरली जात नसल्याने सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करीत पश्चिम विदर्भातील पाच हजार प्राध्यापक मंगळवारी ११ सप्टेंबरला एक दिवस संपावर गेले. महाविद्यालयीन नियमित दोन हजार, तासिका तत्त्वावरील तीन हजार प्राध्यापकांचा समावेश होता. 


महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने १७ जून २०१८ रोजीच्या निर्णयानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील जवळपास ९५ टक्के महाविद्यालयातील प्राध्यापक एक दिवसाची किरकोळ रजा घेउन कामबंद आंदोलनात सहभागी झाले. राज्यात २७ हजार पैकी प्राध्यापकांच्या ११ हजार जागा रिक्त आहेत. त्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत ३०० पटीने वाढ झालेली आहे. गत चार वर्षात शिक्षक भरती बंदीमुळे अर्हताधारक उमेदवारांची संख्या वाढत अाहे. केंद्र सरकारने निर्धारित केलेले एक दिवसाचे श्रममूल्य किमान ४५० रुपये असून तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मात्र ७ तासिका आठवडा भर घेत असून त्याना एका दिवसाला एका तासिकेचे २४० रूपये मिळतात. या वेतनावर चार वर्षांपासून काम करण्यास बाध्य झाले. पुढील आंदोलनात नियमित प्राध्यापक,तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाच्या सहभागाने या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागणार आहे. या पुढील आंदोलनाच्या टप्प्यावर सरकारचे मंत्री यांना घेराव करून निदर्शने करण्यात येईल, असे ही नुटा, नेट, सेट, पीएचडी धारक कृती समितीने जाहीर केले आहे. 


२५ सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन 
महिना भरापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध टप्प्यावरील आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे कामबंद आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय शिक्षकांसमोर उरला नाही. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास राज्य सरकारचा उच्च शिक्षण विभाग जबाबदार राहील, ही बाब आता स्पष्ट झालेली आहे. आगामी २५ सप्टेंबरपासून हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.

- डॉ. प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष नुटा 


Loading...

Recommended


Loading...