Loading...

डॉ.हिना गावीत लोकसभेमध्ये म्हणाल्या, मृत्यू समोर उभा होता, हा मॉब लिंचिंगसारखा प्रकार

धुळ्यात भाजप खासदार डॉ.हिना गावीत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

Divya Marathi Aug 07, 2018, 08:59 IST

नवी दिल्ली - धुळ्यात भाजप खासदार डॉ.हिना गावीत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. हिना गावीत यांनी लोकसभेमध्ये झिरो अवरदरम्यान त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची माहिती दिली. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणीही केली. काही माध्यमांशी बोलताना हिना गावीत यांनी हा प्रकार मॉब लिंचिंग सारखा होता आणि मृत्यू माझ्या डोळ्यासमोर उभा होता अशी प्रतिक्रियाही दिली. 


संसदेत काय म्हणाल्या डॉ. गावीत 
हिना गावीत लोकसभेत म्हणाल्या, जवळपास 200 आंदोलकांनी माझ्यावर हल्ला केला. मी धुळ्याहून जात होते. त्यावेळी तेथे फक्त चार पोलिस होते. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला वाचवले. पोलिसांनी 15-20 जणांना अटक केली पण नंतर त्यांनाही सोडून देण्यात आले. फक्त आदिवासी असल्याने हा हल्ला झाला का अशी विचारणाही त्यांनी केली. 200 आंदोलकांवर कारवाई न केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणीही त्यांनी केली. गावीत यांनी यावेळी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे फोटोही दाखवले. त्यात हल्लेखोर दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. 


साक्षात मृत्यू समोर उभा 
डॉ.हिना गावीत यांनी हा मॉब लिंचिंगसारखा प्रकार होता असे म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा साक्षात मृत्यू आपल्या डोळ्यासमोर उभा होता असेही हिना गावीत म्हणाल्या आहेत. या घटनेनंतर विविध माध्यमांशी बोलताना गावीत यांनी या घटनेबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार डॉ.हिना गावीत यांनी या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. 


नेमके काय घडले 
खासदार डॉ. हिना गावीत या एका बैठकीसाठी धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या होत्या. मिटींग संपल्यानंतर परत जाण्यासाठी त्या निघाल्या तेव्हा अचानक मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हिना गावीत कारमध्ये असताना आंदोलक कारवर चढले. पोलिसांनी गावीत यांना बाहेर काढल्यानंतर काही आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही गावीत म्हणाल्या. 


Loading...

Recommended


Loading...