Loading...

स्त्रिया आणि उपनयन

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिल

Divya Marathi Aug 28, 2018, 00:42 IST

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


विद्याध्ययनासाठी ब्रह्मचर्याची विधिपूर्वक दीक्षा देऊन म्हणजे व्रतबंध करून अध्ययनासाठी गुरूकडे घेऊन जाणे हा संस्कार प्राचीन काळी मुलगा आणि मुलगी दोघांसाठी होता. स्त्रिया अध्ययन करत हे ऋग्वेदातील ऋचांच्या आधारे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी सिद्ध केले आहे. परंतु पुढे शिक्षणाला प्रवेश मिळवून देणारा हा संस्कार इसवी सनाच्या पूर्वी पाचव्या-सहाव्या शतकापर्यंत मुलींच्या बाबतीत कसाबसा उरकला जाऊ लागला आणि तिसऱ्या-चौथ्या शतकात तो बंद पडला. यालाही धार्मिक वाङ्मयात पुरावे सापडतात. इ.स.पू. ५००च्या सुमारास होऊन गेलेल्या हारीताने हारीतधर्मसूत्रांत ब्रह्मवादिनी आणि सद्योवधू यांच्याविषयी केलेल्या विवेचनावरून केवळ ब्रह्मवादिनींचा उपनयनविधी होत असे आणि बहुसंख्य स्त्रियांचा उपनयनविधी कसातरी (कथमपि) उरकून घेतला जात असे असा निष्कर्ष आळतेकर यांनी काढला आहे. विवाह हाच स्त्रियांचा उपनयनसंस्कार असल्यामुळे त्यांना वेगळ्या उपनयनाची गरज नाही, अशी घोषणा मनूने इ.स.पू. ३००च्या सुमारास केली होती. (मनु. २.६७). पां.वा. काणे म्हणतात की, मनुस्मृतीच्या काळात स्त्रियांच्या उपनयनाची प्रथा बंद झाली होती आणि प्राचीन काळात ते होत असल्याच्या अस्पष्ट आठवणी मात्र शिल्लक राहिल्या होत्या असे दिसते.


याज्ञवल्क्यस्मृतीनेही स्त्रियांचे विवाहाखेरीज सर्व संस्कार अमंत्रक करावेत, असे म्हटले (याज्ञ. १. १३). शंकराचार्यांनी स्त्रियांच्या पांडित्याचे स्पष्टीकरण करताना गृहतंत्रविषयक असे विशेषण लावले आहे. स्त्रीला वेदाध्ययनाचा अधिकार नसल्यामुळे येथे वैदिक पांडित्य अभिप्रेत नाही, असे कारण त्यांनी दिले आहे (बृहदारण्यकोपनिषद भाष्य, ६.७.१७) वर उल्लेखलेल्या सद्योवधूचा उपनयनविधी होत असे. परंतु सद्योवधू म्हणजे विवाह निश्चित होताच उपनयन उरकून विवाहवेदीवर चढणारी वधू असा आहे. ‘न ही शूद्रयोनौ ब्राह्मणक्षत्रियवैश्या जायन्ते’ एवढ्या तांत्रिक कारणासाठीच हे उपनयन कसेतरी उरकले जात होते, हळूहळू तेही बंद पडले. स्त्रियांचे उपनयन बंद पडल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग बंद झाला, असा निष्कर्ष आ. ह. साळुंखे (पृ. २६) आणि बाब्रस-कोत्तापल्ले (पृ. २३) यांनी काढला आहे. मुलींना घरीच वडील, चुलते, भाऊ यांनी शिकवावे असे मत यम या स्मृतिकाराने मांडले. स्त्रियांच्या शिक्षणाची ही व्यवस्था पाहिल्यावर प्रत्येक कुटुंबात स्त्रियांना वेदशास्त्राचे कोणी गंभीरपणे अध्यापन करीत असेल असे म्हणता येत नाही. 


अध्यापिकांचे निर्देशक असे व्याख्याती, आचार्या, उपाध्याया, विद्योपदेशिनी हे शब्द प्राचीन काळात जमा झाले होते. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा नव्हत्या, हे शारदा देशमुख यांनीही नमूद केले आहे. (शिवकालीन व पेशवेकालीन स्त्रीजीवन, १९७३, पृ. ४). गार्गी, मैत्रेयी या वेदशास्त्रसंपन्न स्त्रिया अपवादात्मक होत्या; ते स्त्रीशिक्षणाचे प्रातिनिधिक चित्र नव्हते. 


स्त्रियांच्या शिक्षणाचा दर्जा अत्यंत प्राचीन काळी मध्ययुगापेक्षा आणि अर्वाचीन काळापेक्षा पुष्कळच वरचा होता. पुष्कळशा स्त्रियांनी वेदमंत्र रचले आहेत आणि अनेक स्त्रिया अध्यात्मविद्येत निपुण होत्या. त्या शिक्षकाचेही काम करीत असत. परंतु क्रमाक्रमाने स्त्रियांची स्थिती अधिकाधिक वाईट होत गेली आणि धर्मसूत्रांत आणि मनुस्मृतीत स्त्रियांना आश्रिताचे स्थान देण्यात आले आणि वेदाभ्यास प्रभृती अनेक बाबतींत उच्चवर्णांच्या स्त्रियांना शूद्रांच्या समान मानण्यात येऊ लागले (गौ. १८.१; वसि. ध. सू. ६.१; बौ. ध. सू. २.२.४५; मनु. ९.३). स्त्रियांमध्ये वाङ्मयीन शिक्षणाचा अभाव अथवा अस्त झालेला असल्यामुळे सहशिक्षणाचा प्रश्नच उद्भवत नसे. स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली असली तर त्यांचे शिक्षण पुरुष विद्यार्थ्यांच्या बरोबर होत असावे, असे दर्शवणारे काही अस्पष्ट उल्लेख काव्यग्रंथांत आढळतात. (उदाहरणार्थ, मालतीमाधव नाटकात उल्लेख केलेली कामंदकी पुरुषविद्यार्थ्यांबरोबर एकाच गुरुकडे अध्ययन करते). (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. १८१)


इ.स.पूर्व २५०च्या सुमारास मात्र मुलींचे उपनयन बंद झाले. तसेच त्यांचा वेदाधिकार व यज्ञाधिकारही संपुष्टात आणला गेला. याचे प्रमुख कारण म्हणजे आर्यांनी आर्येतर स्त्रियांशी विवाह करणे सुरू केले, हे होय. आर्येतर स्त्रिया घरात आल्याने आर्य स्त्रियांचा दर्जाही कमी होऊ लागला. आर्येतर स्त्रियांना संस्कृत येत नसे. त्यामुळे त्यांना वेदाधिकार किंवा यज्ञाधिकार देणे शक्य नव्हते. पुष्कळदा आर्येतर स्त्रियांना त्यांचे पती धर्मकार्यात सहभागी करीत असावे. पण हा अनाचार टाळावा, म्हणून ऐतिशायनादी आचार्यांनी स्त्रियांचा वेदाधिकार काढून घेण्याचे योजले. जैमिनी, बादरायण वगैरे आचार्यांनी त्याला विरोध केला. पण त्यांना यश आले नाही. मुलींचे विवाह या वेळी तेरा-चौदाव्या वर्षी होत. त्यामुळे उपनयनानंतर त्यांचे फारसे वेदाध्ययन होत नसे. उपनयन हा त्यामुळे निरर्थक संस्कार बनत चालला. तेव्हा स्त्रियांचे उपनयन करू नये व त्यांना वेद शिकवू नये, अशासारखी मते समाजात लोकप्रिय होऊ लागली. त्याचा स्त्रीशिक्षणावर अनिष्ट परिणाम झाला.

- कविता महाजन, वसई 
kavita.mahajan2008@gmail.com


Loading...

Recommended


Loading...