Loading...

‘एसअायटी’कडून मारहाण झाल्याचा संशयित अाराेपी बंगेराचा काेर्टात अाराेप

न्यायालयाने शरद कळसकर याच्या कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ करून दिग्वेकर आणि बंगेरा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Divya Marathi Sep 11, 2018, 08:44 IST

पुणे- अंनिसचे  संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर खूनप्रकरणी सीबीअायच्या काेठडीत असलेला राजेश बंगेरा यांची कोल्हापूर एसआयटीने  कॉ. पानसरे खून प्रकरणात चौकशी केली. मात्र, यादरम्यान बंगेराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याचे वकील धर्मराज चंडेला यांनी न्यायालयात केला. दरम्यान, न्यायाधीशांनी बंगेरा याला सीबीअाय विराेधात काही तक्रार अाहे का?  अशी विचारणा केल्यावर त्याने मला काेठडीत मारहाण केल्याचा आरोप केला. यावर सीबीअायचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी मात्र अाराेप फेटाळून लावताना वैद्यकीय तपासणीत अशाप्रकारे मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे न्यायालयासमाेर सांगितले.


दरम्यान, सीबीअायचे वतीने साेमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सय्यद यांच्या न्यायालयात अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा अाणि शरद कळसकर यांना हजर करून पाेलिस काेठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने कळसकर याच्या काेठडीत १५ सप्टेंबर पर्यंत वाढ करून दिग्वेकर अाणि बंगेरा यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली. सीबीअायचे वकील ढाकणे युक्तिवाद करताना म्हणाले, गेल्या एक दशकापासून अमित दिग्वेकर हा सनातन संस्थेच्या फाेंडा, गाेवा येथील अाश्रमात राहत होता. त्यानंतर त्याची विरेंद्रसिंग तावडे याच्याशी ओळख झाली. तावडे याने अार्थिक निधीचे पाठबळ त्यास दिले असून त्याच्यासाेबत गुन्हेगारी कट रचून इतर अाराेपींशी समन्वय साधण्याचे काम त्याने केले अाहे. डाॅ.दाभाेलकर प्रकरणात अमाेल काळेसाेबत त्याने रेकी केली अाहे. राजेश बंगेराने वीरेंद्र तावडे अाणि अमाेल काळे यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले असून इतर अाराेपींना ही वेगवेगळया ठिकाणी शस्त्र प्रशिक्षण त्याने दिले अाहे.    


आध्यात्मिक संघटनेशी निगडित गुन्हेगार नाहीत : चंडेला
बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेला न्यायालयात युक्तिवाद करताना म्हणाले, अमित दिग्वेकर हा सनातन संस्था अाणि हिंदू जनजागृती समिती याच्याशी संबंधित काम मागील अनेक वर्षापासून करत असल्याचे सांगण्यात अाले अाहे. मात्र, काेणत्याही आध्यात्मिक संघटनेशी निगडित राहून काम करणे गुन्हेगारी कृत्य समजले जात नाही. दिग्वेकरने दाभाेलकर खुनाचा कट कुठे अाणि कसा रचला याबाबत सीबीअायने काेणताही खुलासा केलेला नाही. तसेच राजेश बंगेराला  कुठे शस्त्र प्रशिक्षण दिले, त्याला काेणी शस्त्र दिली अाणि डाॅ. दाभाेलकर प्रकरणाशी त्याचा कशाप्रकारे संबंध अाला याबाबत सीबीअायचा तपास झाला नाही. शरद कळसकर याने वापरलेली दुचाकी अाणि शस्त्र यांचा संबंध दुसऱ्या गुन्ह्यांशी  सीबीअाय जाेडत असून तपासात ताे सहकार्य करत असल्याने त्याच्या काेठडीची अावश्यकता नाही.


तपासात प्रगती नसल्याने न्यायालयाने फटकारले  
अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा व कळसकर यांच्या काेठडीत वाढ करण्याची मागणी सीबीअायने केली.  याप्रकरणी सीबीअायच्या वकीलांनी केस डायरी न्यायालयात दाखल करत तपासातील प्रगतीची माहिती दिली. मात्र, दहा दिवस अाराेपी ताब्यात असूनही काेणतीही विशेष प्रगती तपासात दिसून न अाल्याने न्यायालयाने सीबीअायच्या वकीलांना फटकारत अाराेपींची पाेलिस काेठडीची मुदत वाढवून देण्यास नकार देत, बंगेरा अाणि दिग्वेकर यांना न्यायालयीन काेठडी मंजूर केली. दरम्यान, बंगेरा अाणि दिग्वेकर यांना कर्नाटक  बंगळुरू न्यायालयात १७ सप्टेंबर राेजी पत्रकार गाैरी लंकेश खून प्रकरणात ‘प्राॅडक्शन वाॅरंट’ घेऊन हजर केले जाणार अाहे.  

 


Loading...

Recommended


Loading...