Loading...

PNB Scam: नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने बजावले रेड कॉर्नर नोटीस; राहाते बेल्जियममध्ये

नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 09:34 IST

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) २ अब्ज अमेरिकी डॉलरच्या (सुमारे १३ हजार कोटी रुपये) मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या फरार असलेला अब्जाधीश नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ही नोटीस आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून काम करते. मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोप प्रकरणात पूर्वी मोदी (४४) वाँटेड आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. 


सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ईडीने आपल्या चौकशी अहवालात केलेल्या आरोपानुसार, पीएनबी घोटाळ्यातील रक्कम मनी लाँडरिंगद्वारे वळती करण्यात पूर्वी मोदीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिला या घोटाळ्यात १३.३ कोटी अमेरिकन डॉलरचा (सुमारे ९५० कोटी रुपये) लाभ झाला आहे. ती अनेक बनावट किंवा गुंतवणूक कंपन्यांची मालक/संचालक आहे. घोटाळ्यातील पैसा वळता करण्यासाठी संयुक्त अरब अमिरात, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सिंगापूर येथे या कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणाची चौकशी पुढे नेण्यासाठी पूर्वी मोदीने चौकशीला सहकार्य करावे, अशी इच्छा ईडीने व्यक्त केली अाहे. पूर्वीने चौकशीसाठी बजावलेले समन्स स्वीकारले नाही. त्यामुळे तिच्याविरोधात जागतिक वॉरंट काढले जावे, असे ईडीने म्हटले असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. 


चोकसीविरुद्धच्या नोटिसीची करून दिली आठवण 
पंजाब नॅशनल बँक मनी लाँडरिंग प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यासाठी ईडीने इंटरपोलकडे अर्ज सादर केला होता. ईडीने इंटरपोलला त्याची पुन्हा आठवण करून दिली आहे. ईडीने या प्रकरणात मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर चोकसीला अटक करण्यासाठी त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर इंटरपोलने या प्रकरणात आणखी काही माहिती मागितली. तिला उत्तर देण्यात आले आहे. आता आम्ही रिमाइंडर पाठवले आहे. 

 

 


Loading...

Recommended


Loading...