Loading...

देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

कौटुंबिक वादातून पतीने देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून पत्नीची हत्या केली.

Divya Marathi Sep 13, 2018, 08:41 IST

नागपूर- कौटुंबिक कलहातून व्यापाऱ्याने पत्नीवर देशी पिस्तुलातून गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पूर्व नागपुरातील दत्तात्रयनगर येथे मंगळवारी मध्यरात्री ही घडली. रवींद्र नागपुरे आणि मीना नागपुरे अशी मृतांची नावे आहेत. 


रवींद्रचा प्लायवूडचा मोठा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यांपासून तो कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कोंडीत सापडला होता. त्याच वेळी पत्नी मीना हिच्याशी त्याचा कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. या वादामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. त्याची पत्नी दत्तात्रयनगरातील घरी मोठ्या मुलासह राहत होती, तर रवींद्र हा दुसऱ्या घरात लहान मुलासह वास्तव्याला होता. मंगळवारी कोर्टाची तारीख होती. मात्र, त्याला रवींद्र उपस्थित झाला नाही. मंगळवारी रात्री रवींद्र हा पत्नीला भेटायला गेला. त्या वेळी दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक रवींद्रने त्याच्याजवळील देशी पिस्तुलातून मीनावर गोळी झाडली. यात जागेवरच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रवींद्रनेही स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर प्रथम शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी जखमी रवींद्र याला जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. 

 

 


Loading...

Recommended


Loading...