Loading...

जनसंघर्ष यात्रा..राज्यात आंधळे-बहिरे सरकार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणांवरही

Divya Marathi Sep 01, 2018, 19:09 IST

चोकाक (जि. कोल्हापूर)- शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

 

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चोकाक येथे आयोजित सभेत  अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरवरच्या सुट्या भागांवर आणि इतर शेती अवजारांवर जीएसटी लावणाऱ्या या सरकारने आता शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या मोदी, फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

 

या वेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते व माजी खा. कलाप्पा आवाडे, माजी मंत्री आ. बसवराज पाटील, आ. डी. पी. सावंत, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, काँग्रेस सेवादलाचे राज्य संयोजक विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, राजूबाबा आवळे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रकाश सोनावणे, विनायक देशमुख, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, अभिजित सपकाळ, सचिव प्रकाश सातपुते, शाह आलम, तौफिक मुलाणी, सत्संग मुंडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप-शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत करण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करत आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे या भागातील पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरू असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही, असे चव्हाण म्हणाले.

 

आता परिवर्तन होणार : आ. सतेज पाटील
जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यावर आता परिवर्तन होणार यात काही शंका नाही. या परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोल्हापूर जिल्ह्याचा राहील.  काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार कोल्हापूर जिल्हा निवडून देईल. जयवंत आवळे व प्रकाश आवाडे म्हणाले, अशोक चव्हाण यांनी आम्हा दोघांना एका व्यासपीठावर आणले. आम्ही त्यांना विश्वास देतो की आम्ही मिळून काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू.


Loading...

Recommended


Loading...