Loading...

एचएएलला काम कमी पडू देणार नाही, फक्त त्यांनी कामाचा वेग वाढवावा : भामरे

राफेल या लढाऊ विमानांचे काम एचएएलला डावलून रिलायन्स डिफेन्सला दिल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचा संरक्षण राज्यमंत्री सुभाष

Divya Marathi Sep 11, 2018, 08:54 IST

नाशिक- राफेल या लढाऊ विमानांचे काम एचएएलला डावलून रिलायन्स डिफेन्सला दिल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचा संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी इन्कार केला. एचएएल किंवा कोणताही सरकारी उद्योग बंद पडू दिला जाणार नाही. 'तेजस'च्या निर्मितीचे काम फक्त बंगळुरूतील प्रकल्पाकडे दिलेले नसून संपूर्ण एचएएलकडे दिलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या दरवर्षी ८ तेजस विमानांची निर्मिती होत असून तो वेग वाढवून १२ करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राफेलबद्दल काँग्रेसच्या आरोपाबद्दल मात्र सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले. 


ओझर येथील एचएएलच्या विभागास मार्च २०१९ नंतर काम नसल्याची तक्रार कामगार संघटना करीत आहेत. सध्या तिथे सुरू असलेले सुखोई-३० चे काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लढाऊ विमानांच्या ओव्हरहॉल्व्हचे काम १ हजार कामगारांना पुरेसे आहे. मात्र, सध्याच्या कार्यरत २ हजार ५०० कायमस्वरूपी आणि २ हजार कंत्राटी अशा जवळजवळ ५ हजार ५०० कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, पब्लिक सेक्टर अजिबात बंद पडू देणार नाही या शब्दात त्यांनी एचएएलच्या कामगारांना आश्वस्त केले. आयुध निर्मितीच्या क्षेत्रात खासगी उद्योग आले म्हणून सरकारी कारखाने बंद पडले नाहीत याचा दाखला त्यांनी दिला. मात्र, खासगी क्षेत्राशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी उद्योगांनी त्यांची कार्यक्षमता, उत्पादनाचा वेग आणि दर्जा वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 


घोटाळ्यांच्या शोधात विरोधक 
चार वर्षांपूर्वी देशात घोटाळ्यांची बजबजपुरी झाली होती. म्हणून जनतेने तत्कालीन सरकार बदलून भाजपला सत्ता दिली. मोदी सरकारच्या चार वर्षांत विरोधकांना कोणताही घोटाळा सापडला नाही. पुढील निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे ते घोटाळ्यांच्या शोधात आहेत. राफेलबाबतच्या त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. केंद्र सरकारने रिलायन्स डिफेन्सला कोणतेही काम दिलेले नाही. 


Loading...

Recommended


Loading...