Loading...

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे मनोमिलन व्हावे : विखे

नगर महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीशी अद्यापि चर्चा झालेली नाही. याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असाव

Divya Marathi Sep 08, 2018, 11:39 IST

नगर- नगर महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीशी अद्यापि चर्चा झालेली नाही. याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असावी. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन व्हावे, ही माझी मनस्वी इच्छा आहे, अशी अपेक्षा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 


जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे म्हणाले, महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोमिलन व्हावे, ही माझी मनस्वी इच्छा आहे. दोन्ही काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बैठक घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. शेतमाल, कर्जमाफी यात सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहेत. सामाजिक अशांतता वाढली आहे. दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी २ लाखदेखील रोजगार उपलब्ध करून दिलेले नाहीत. व्यापारी, उद्योजक अडचणीत आले आहेत. काळा पैसा परत येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, तो परत आला नाही. सरकारविषयी जनतेला आदर वाटत नाही. अनेक आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले अाहे. काँग्रेसशिवाय पर्याय नाही, अशी भावना लोकांमध्ये आहे. या सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. भाजपने कदम यांना पक्षातून निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यांचे निलंबन झाल्याशिवाय आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सुधाकर परिचारक यांच्यावर कारवाई करण्यासाठीही सरकार चालढकल करत होते. रावसाहेब दानवे हेही बेताल वक्तव्य करत आहेत. भाजपला सत्तेची धुंदी चढली आहे. त्यांना पैशांचा मस्तवालपणा आला आहे, असा आरोप त्यांनी केला. 


Loading...

Recommended


Loading...