Loading...

काँग्रेसला जागावाटपाचा फॉर्म्युला दिलेलाच नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काँग्रेसला अद्याप कुठलाही फॉर्म्युला देण्यात आलेला नाही. आघाडीची चर्चा सध्या केंद्रीय

Divya Marathi Sep 06, 2018, 07:10 IST

नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काँग्रेसला अद्याप कुठलाही फॉर्म्युला देण्यात आलेला नाही. आघाडीची चर्चा सध्या केंद्रीय पातळीवरच सुरू असून राज्यात अद्याप त्याची सुरुवातही झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 


आगामी निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीकडून जागावाटपाचा ५०-५० चा फॉर्म्युला देण्यात आल्याच्या दाव्यात कुठलेही तथ्य नाही. यासंदर्भात राज्यात अद्याप चर्चाच सुरू झालेली नाही. आघाडीची चर्चा केवळ शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यातच सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातही एकत्र बसून जागावाटपावर निर्णय घेऊ. 


राज्यात शंभर टक्के परिवर्तन होईल. केंद्रातही मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना फटका बसला आहे. नोटबंदी सपशेल अपयशी ठरली. त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत. जीएसटीला आम्ही पाठिंबा दिला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अत्यंत वाईट पद्धतीने झाली. त्यामुळे व्यापारी वर्ग प्रचंड नाराज आहे. या परिस्थितीत मोदी सरकारच्या लोकप्रियतेला मोठी ओहोटी लागली असून त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येतील. सध्या पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दरवाढीमुळे लोक त्रस्त आहेत. पेट्रोल शंभर रुपये लिटर दरावर नेण्याचा विक्रमही मोदी करतील, अशी टीकाही पाटील यांनी केली. दरम्यान, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या व्यापारी आघाडीचे प्रमुख असलेले नेते धनराज फुसे यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


शिवसेनेवर जनतेचा भरवसा राहिला नाही 
भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला धोरणच नाही. एकीकडे ते सरकारच्या विरोधात बोलतात, तर दुसरीकडे ते मंडळ व महामंडळावरील पदेही स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता लोकांचा भरवसा राहिलेला नाही. 


Loading...

Recommended


Loading...