Loading...

गोव्यात राष्ट्रपती राजवट लावा; काँग्रेसची मागणी; पर्रीकरांच्या अनुपस्थितीमुळे राज्यात पेच : खलप

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी

Divya Marathi Sep 04, 2018, 08:53 IST

पणजी- वैद्यकीय उपचारासाठी सध्या अमेरिकेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाने केली आहे. 


पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस पक्षाचे गोव्याचे प्रवक्ता रमाकांत खलप म्हणाले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे राज्यात सतत अनुपस्थित आहेत. त्यांनी आपला पदभार कोणाकडेही सोपवलेला नाही. त्यामुळे राज्यात 'घटनात्मक पेच' उद्भवला आहे. राज्यातील पेचावर चर्चा करून राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी या मागणीसाठी मी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्याचप्रमाणे गोव्याचे ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा हेही आजारी आहेत. मुख्यमंत्री आणि हे दोन्ही मंत्री राज्यात केव्हा परततील हे निश्चित नाही. मुख्यमंत्र्यांची तात्पुरती गैरहजेरी आम्ही समजू शकतो, पण जर ही गैरहजेरी २४ तासांपेक्षा जास्त असेल तर इतर कोणाला तरी अधिकार देण्यात यावेत. राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. घटनात्मक पेच उद्भवला अाहे. मंत्रिमंडळाची किती वेळा बैठक झाली आहे? लोकशाहीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्यामुळे आता राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. 


शपथेचे उल्लंघन केल्याचा आरोप 
राज्याबाबतची कर्तव्ये पूर्ण करण्याची शपथ पर्रीकर आणि इतर दोन मंत्र्यांनी घेतली आहे. मात्र, त्यांनी या शपथेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप करून खलप म्हणाले की, तुम्ही आजारी अाहात आणि कर्तव्य पार पाडू शकत नसला तर ते शपथेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडते. त्यामुळे आता सरकार बडतर्फ करण्यात यावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट जारी करण्यात यावी. त्यासाठीच आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत आणि खाण उद्योगातील काम बंद पडणे, महादायी नदी पाणीवाटप वाद आणि गुन्हे रोखण्यात आलेले अपयश या तीन मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. 


Loading...

Recommended


Loading...