Loading...

बेताल वक्तव्य करुन वादात सापडलेले भाजपचे आमदार कदम यांच्या पुतळ्याचे दहन

बेताल वक्तव्य करुन वादात सापडलेले भाजपचे आमदार राम कदम यांचा निषेध नोंदवताना त्यांच्या पुतळ्यास गुरुवारी शिवसेनेने जोडे

Divya Marathi Sep 07, 2018, 11:49 IST

संगमनेर- बेताल वक्तव्य करुन वादात सापडलेले भाजपचे आमदार राम कदम यांचा निषेध नोंदवताना त्यांच्या पुतळ्यास गुरुवारी शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनास महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख जिल्हा शुभांगी नांदगावकर यांनी हजेरी लावली. 


राम कदम नावाने केवळ राम असून काम रावणाचे करत आहेत. सीतामाईला रावणाने पळून नेले होते, तसे हा राम मुलींना पळवून आणण्याचे वक्तव्य करत असून भाजपच्या कमळाबाईने ही एक बेबंदशाही सुरु केली आहे. त्यांना दिलेली सुरक्षा काढण्यात यावी; अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा नांदगावकर यांनी यावेळी दिला. 


बसस्थानकासमोरील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनीही कदम यांचा निषेध केला. पुतळ्यास महिलांनी जोडे मारले. घोषणाबाजीही करण्यात आली. नंतर पोलिसांनी कदम यांचा पुतळा ताब्यात घेतला. संगीता गायकवाड, शीतल हासे, सुरेखा गुंजाळ, नगरसेवक लखन घोरपडे, मुजीब शेख, अशोक सातपुते, अमित चव्हाण, रमेश काळे, भाऊसाहेब हासे, विकास डमाळे, जालिंदर लहामगे यावेळी उपस्थित होते. 


नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी शेकडो महिला रस्त्यावर आल्या. संस्कृतीहीन आणि वाचाळवीर आमदार कदमांविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला. कदम यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत त्यांचे तोंड या महिलांनी काळे केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला माफीनाम्यानंतरदेखील कदम यांचा निषेध सुरु आहे. कदम यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिला काँग्रेसने काढलेल्या निषेध माेर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. बसस्थानकासमोरील क्रांती चौकात महिला रस्त्यावर उतरल्यानंतर वाहनांची मोठी कोंडी झाली होती. तासभर सुरु असलेल्या या आंदोलनादरम्यान महिला आणि तरुणींनी आमदार कदम यांच्या सभ्यतेचा बुरखाच फाडला. 
या माेर्चात काँग्रेस व्यक्तिरिक्तही महिलांचा समावेश होता. नगरसेविका, वैद्यकीय व्यावसायिक, वकील आदी विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्या होत्या. अॅड. रंजना पगार-गवांदे, अॅड. निशा शिवुरकर, पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे, सुनंदा दिघे, योगिता पवार, मालती डाके, प्रमिला अभंग, मनीषा भळगट, अपर्णा देशमुख, अॅड. ज्याेती मालपाणी, सुहासिनी गुंजाळ, सोनाली शिंदे, डॉ. दीपाली पानसरे, मंगल कासार आदींती भाषणे झाली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. प्रांताधिकारी भागवत डोईफाडे यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 


शेवगावमध्ये आमदार राम कदम यांच्या पुतळ्याचे दहन
शेवगाव : आमदार कदम यांच्या पुतळ्याचे येथे दहन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान, नगरचा वादग्रस्त उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवरायांचा अपमान, आमदार परिचारक यांनी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीचा अपमान आणि आता आमदार कदम यांनी मुलींचा अपमान केला. मुंबईतील दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी मुलींबद्दल अपशब्द वापरले. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस, भारतीय महिला फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील क्रांती चौकात आमदार कदम यांच्या पुतळ्याचे दहन केले. मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या, यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस डॉ. मेघा कांबळे, मीना कळकुंबे, वसुधा सावरकर, शुभांगी साळवे, शकिला पठाण, सुनीता कांचन, संजय नांगरे, विजय बोरुडे, राजेंद्र मगर, माणिक गायकवाड, कांचन भिसे, भाऊसाहेब मोहिते उपस्थित होते. 


Loading...

Recommended


Loading...