Loading...

देवकार्य

माझ्या माहेरचे कुलदैवत गोमंतकातील कवळे येथील श्री शांतादुर्गा. आमच्याकडे वर्षातून चार वेळा देवीच्या नावाने देवकार्ये

Divya Marathi Aug 28, 2018, 00:38 IST

माझ्या माहेरचे कुलदैवत गोमंतकातील कवळे येथील श्री शांतादुर्गा. आमच्याकडे वर्षातून चार वेळा देवीच्या नावाने देवकार्ये घातली जायची. श्रावण महिन्यापासून त्यांची सुरुवात व्हायची. नागपंचमी, नवरात्रात महानवमी, मार्गशीर्ष पंचमी आणि माघ पंचमी. एक सवाष्ण आणि एक कुमारिका (तिला मातोळी म्हणत) त्या दिवशी जेवायला असायची. आमचं एकत्र कुटुंब होतं. घरात बारा माणसं. देवकार्यादिवशी पंधराएक माणसं जेवायला असायची. माझी आई आणि काकू (आम्ही तिला काकी म्हणत असू), सकाळी सहा वाजल्यापासून सोवळं नेसून स्वयंपाकाला लागायच्या. कांदा-लसूणविरहित स्वयंपाक ठरलेला असे. वर्षानुवर्षे त्यात कसलाही बदल झाला नाही. 
डाव्या बाजूला मीठ, लिंबू, आल्याचे रायते, काकडीची कोशिंबीर, तळलेले पापड-कुरडया, कोबी, फरसबी, चवळीच्या शेंगा यापैकी एक सुकी भाजी, आंबट बटाटा, मोड आलेले मूग, मोड आलेले काळे वाटाणे, भिजवलेली चणाडाळ यापैकी एका कडधान्याची गरम मसाल्याची आमटी, पुऱ्या आणि नारळाचा रस-गूळ घालून केलेली तांदळाची खीर. यात बदल एवढाच की, कधी आल्याच्या रायत्याऐवजी पंचामृत किंवा चटणी, पिकलेल्या केळ्याचे रायते, आंबट बटाट्याऐवजी अळूची पातळ भाजी आणि बटाट्याची सुकी भाजी, रस-गुळाच्या खिरीऐवजी दूध-साखर घालून तांदळाचं पायस असा बेत असे. 


तसं पाहिलं तर नागपंचमीला तळणं, चिरणं करत नाहीत. पण परंपरेनुसार आमच्या घरी देवकार्य असल्यामुळे भाज्या चिरणं आणि पुऱ्या तळणं अनिवार्य होतं. बाहेरच्या मोठ्या हाॅलमध्ये पाट आणि केळीची पानं मांडून पंगतीची तयारी होत असे. नैवेद्याची पाने वाढल्यावर प्रथम सवाष्ण आणि मातोळीची पूजा करून, दक्षिणा देऊन झाल्यावर सर्वजण जेवणाला सुरुवात करीत. आता ते दिवस राहिले नाहीत. पुढच्या पिढीतील मुलं नोकरी-धंद्यासाठी परगावी, परदेशात स्थायिक झाली. देवकार्ये बंद झाली. वर्षातून एकदा कुलदैवताच्या भेटीला गेल्यावर या देवकार्यांसाठी एक रक्कम देवस्थानच्या कार्यालयात जमा करून परंपरा जपल्याचं समाधान मानावं लागतं. काळानुसार खाण्याच्या आवडीनिवडीही बदलल्या. 


हे सर्व लिहीता लिहीता मनाशी ठरवलं की, या वेळी नागपंचमीला देवकार्याचा स्वयंपाक करायचा. त्यानुसार सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केला. मात्र वेळेवर केळीची पाने न मिळाल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.


- भारती नाडकर्णी, पुणे
bmnadkarni@gmail.com 


Loading...

Recommended


Loading...