Loading...

किन्नर ममताबाईने दिव्यांग महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर तिची मुलगी दत्तक घेऊन दुसरा संसार उभा करून दिला

किन्नर ममताबाईच्या कडेवर एक अडीच वर्षाची चिमुकली पाहून प्रत्येक जण आचंबित होतो. कुणी नाते विचारलेच तर ममता म्हणते, ही चिमुकली पूजा माझी मुलगी आहे.

Divya Marathi Dec 29, 2016, 06:47 IST
बिकानेर (राजस्थान) - किन्नर ममताबाईच्या कडेवर एक अडीच वर्षाची चिमुकली पाहून प्रत्येक जण आचंबित होतो. कुणी नाते विचारलेच तर ममता म्हणते, ही चिमुकली पूजा माझी मुलगी आहे. पूजाही ममताला नानी मां म्हणून बोलावते. ममताही तिच्यावर तेवढेच प्रेम करते. मुलीची वेणी घालण्यापासून सारे ममताच करते. यामागची कहाणी ऐकली की ममताचे मोठेपण कळते...   पूजाचे वडील दिव्यांग होते. ममताच्या शेजारी ते राहत असत. ममताने पुढाकार घेऊन एका दिव्यांग मुलीशी त्यांचा विवाह लावून दिला होता. त्यांना मुलगी झाली. मात्र, मुलीच्या जन्माआधीच दिव्यांग पित्याचा मृत्यू झाला. आता दिव्यांग आईला तिचे संगाेपन करणे शक्य नव्हते. ममताला राहवले नाही. तिचे मातृत्व जागे झाले. तिने मुलीच्या दिव्यांग आईचा पुनर्विवाह लावून दिला आणि छोटी चिमुकली दत्तक घेतली. आता ममता या चिमुकलीस जिवापाड जपते. सकाळपासून रात्रीपर्यंत ममता या मुलीच्या सेवेत असते. तिला झोपेतून उठवायचे, दूध पाजवायचे, स्नान घालायचे... एवढे झाले की मग दुसऱ्या कामाला लागायचे. ममता म्हणते, पूजाला मी चांगल्या शाळेत घालणार आहे. तिला शिकवून मोठी अधिकारी करेन. राजस्थानातील बिलाडाची रहिवासी ममता तेथे शुभकार्यात नाच-गाणे करते. यातून होणाऱ्या कमाईतून घर आणि पूजासाठी होणारा खर्च भागवते. पूजाची दिव्यांग आईही तिला भेटण्यासाठी येत असते.
सध्या ममता बिकानेरमध्ये किन्नरांच्या राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आली आहे. अनेक किन्नर येथे आले आहेत. त्या सर्वांच्या आयुष्याच्या कथा मानवतेचा एक आदर्शच आहेत. किन्नर नीतूबाई भरतपूर येथील नगरसेविका आहे. दरवर्षी ती १० गरीब मुलींचे विवाह लावून देते. यातील ५ मुली मुस्लिम व ५ हिंदू कुटुंबातील असतात. आतापर्यंत तिने ५० मुलींचे विवाह लावले आहेत. रतनगडच्या चांदनीबाईनेही पाच मुलींचे विवाह लावून दिले आहेत. याशिवाय रुग्णालयांत रुग्णांसाठी थंड पाण्याच्या मशीनही तिने लावून दिल्या आहेत.   (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  

Loading...

Recommended


Loading...