दहावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने लिहिले- भावी वधू पास झालीय, मी नापास झालो तर लग्न मोडेल!
‘सर, मी मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो होतो. आता माझी भावी वधू उत्तीर्ण झाली आहे. यंदाही मी अनुत्तीर्ण झालो तर माझे नियोजित लग्नच मोडून जाईल,’ अशा शब्दांत काही जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण ते कोणत्या चिठ्ठीत किंवा संदेशात नव्हे, तर चक्क दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत.
Divya Marathi Apr 25, 2017, 07:05 IST
भागलपूर (बिहार) - ‘सर, मी मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो होतो. आता माझी भावी वधू उत्तीर्ण झाली आहे. यंदाही मी अनुत्तीर्ण झालो तर माझे नियोजित लग्नच मोडून जाईल,’ अशा शब्दांत काही जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण ते कोणत्या चिठ्ठीत किंवा संदेशात नव्हे, तर चक्क दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत.
हा गमतीशीर प्रकार बिहारच्या भागलपूर मंडळातील दहावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या उत्तरपत्रिकांमध्ये असे एकच नव्हे, तर अनेक प्रकारचे फंडे विद्यार्थ्यांनी वापरले आहेत. उत्तरपत्रिकेच्या सोबत त्यांनी चक्क चिठ्ठ्या जोडल्या आहेत. एकीने तर लिहिले, “मी अनुत्तीर्ण झाले तर सावत्र आई मला घरातून हाकलून लावेल.’ तपासणीस शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने आपल्याला सावत्र आई खूप मारहाण करते. वडिलांना तिने माझ्या दहावीच्या परीक्षेचे शुल्क न भरण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर तिनेच शुल्क भरले. पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यास घरातून हाकलून लावण्याची धमकी दिली आहे. सर, कृपया मला उत्तीर्ण करून टाका. दरम्यान, बिहारची दहावी परीक्षा यापूर्वीही प्रचंड चर्चेत आली होती. परीक्षेत राज्यातून अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना अगदी क्षुल्लक संकल्पनाही येत नसल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दहावी उत्तीर्ण करून देणाऱ्या रॅकेटचाच पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी टॉपर रुबी अग्रवालसह एका टोळीलाच पोलिसांनी अटक केली होती.
उत्तरपत्रिकेत ठेवल्या आहेत नोटा
बिहारच्या सीएमएस मोक्षदा आणि शासकीय शाळेत दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. मात्र, उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकांना अजब समस्यांचा सामना करावा लागत आहे. उत्तरपत्रिकांमध्ये काही विद्यार्थ्यांनी चक्क २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्याही नोटा ठेवल्या आहेत. काही शिक्षक याचा गवगवा करत नाहीयेत, मात्र अनेकांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे.