Loading...

परशुराम वाघमारे याला पाहिले तर नक्की ओळखणार, पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदाराचा दावा

परशुराम वाघमारे याचे छायाचित्र दाखवले अथवा ओळख परेड साठी बोलावण्यात आले तर मी नक्की त्याला ओळखेन असे सांगितले आहे.

Divya Marathi Jun 18, 2018, 18:45 IST

कोल्हापूर- बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील मारेकरी परशुराम वाघमारेसह अन्य सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तूलातून केली गेल्याचे अंदाज पुढे आले असून पानसरे हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिस परशुरामचा चौकशीसाठी ताबा घेणार आहेत. दरम्यान पानसरे हत्याकांडातील सीबीआयचे साक्षीदार असलेले संजय साडविलकर यांनी परशुराम वाघमारे याचे छायाचित्र दाखवले  अथवा ओळख परेड साठी बोलावण्यात आले तर मी नक्की त्याला ओळखेन असे सांगितले आहे. 

 

साडविलकर म्हणाले, परशुराम वाघमारे याला मी ओळखत नाही. त्याचा फोटो ही मी पाहिलेला नाही. पण मला फोटो दाखवला अथवा ओळख परेडसाठी बोलावले तर मी त्याला नक्कीच ओळखेन. 2012 साली डॉ. विरेंद्र तावडे याने साधक विनय पवार याच्यासोबत माझ्याकडे अन्य दोन लोकांची कोल्हापूर येथे निवास व्यवस्था करण्याबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. पण मी त्यावेळी काही करू शकलो नव्हतो. त्यामुळे छायाचित्रे पाहून ओळखणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरक आहे. अमोल काळे यालाही मी पाहिले नाही. पण पाहिले तर ओळखणे अवघड नाही असे ते म्हणाले.
 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे एका धार्मिक संस्थेशी निगडित असल्याने शुभअशुभावर त्यांचा विश्वास आहे. आणि एक हत्या ज्या पिस्तुलातून करण्यात आली त्याच पिस्तुलाला शुभ मानून त्यानंतरच्या हत्त्या करण्यात आल्या असाव्यात असा अंदाजही साडविलकर यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर पोलीस योग्य दिशेने तपास करत असल्याने लवकरच या हत्याप्रकरणातील सर्व माहिती उघडकीस येईल असे ते म्हणाले.

 


Loading...

Recommended


Loading...