Loading...

चंद्रकांतदादांना निवडणुकांना सामोरे जाणे अजून शिकायचे आहे; शरद पवारांनी कोल्हापुरात लगावला टोला

वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत.

Divya Marathi Jul 28, 2018, 15:07 IST
कोल्हापूर- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा गेलो. चंद्रकांत पाटील यांना निवडणुकाना कसे सामोरे जायचे हे अजून शिकायचे आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.

 

वादग्रस्त वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नसतात. हीच बाब मुखमंत्र्यांबाबत लागू होते. मात्र येणाऱ्या काळात निवडणूक असून त्याचा आम्हाला चांगलाच फायदा होईल, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

 

राज्यात मराठा समाजाचा उद्रेक सुरू आहे. महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. या उद्रेकाच्या आगीत तेल ओतण्याचे काम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

माझा पक्ष संसदेत लहान-पण मी पुढाकार घेईन- पवार

राज्यसरकारने मराठा आरक्षणाचा निकाल तातडीने घेतला पाहिजे. कायदेशीर अडचणीला पर्याय आहे.केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि सत्ताधारी पक्षाला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. घटनेची दुरुस्ती करण्याची भूमिका संसदेत मांडली तरी काही प्रमाणात जागा देणे शक्य आहे. माझा पक्ष संसदेत लहान आहे. सरकारने घटना दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली तर मी स्वतः पुढाकार घेऊन विरोधकांशी बोलेन, आणि हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करूया अशी विनंती करेन असे शरद पवार म्हणाले.

 

तरुण मुलांच्या भावना समजू शकतो-

पण त्यांनी समंजस पणाची भूमिका घ्यावी. चार वर्षात सरकारच्या वतीने जी आश्वासने दिली गेली ती पाळली जात नसल्याने तरुणांमध्ये असंतोषाची भावना आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरुण मुलांच्या भावना मी समजू शकतो. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा हा राग आहे. मात्र तरुणांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी असा सबुरीचा सल्ला शरद पवार यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यसरकारची भूमिका मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात हजर राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 


Loading...

Recommended


Loading...