Loading...

पूर्व विदर्भात पावसाचे ४ बळी : अकाेला, अमरावती, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत

भंडारा जिल्ह्यातील राजे दहेगाव येथे घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच घरातील तिघे ठार झाले.

Divya Marathi Aug 22, 2018, 12:45 IST

अकोला- अकाेला, अमरावती, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी जाेरदार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाेते. दुसरीकडे पूर्व विदर्भात चौघांचा बळी गेला. 


छत काेसळून ३ ठार : भंडारा जिल्ह्यातील राजे दहेगाव येथे पावसामुळे एका घराचे छत अंगावर काेसळून शेतमजुराच्या कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. सुखरू दामाेदर खंडाते (३२), सारिका सुखरू खंडाते (२८, पत्नी) व सुकन्या सुखरू खंडाते (३) अशी मृतांची नावे अाहेत, तर गाेंदिया जिल्ह्यातील मुरमाडी (ता. तिराेडा) या गावात शेतात काम करणाऱ्या सुदाम टेकाम यांच्या अंगावर वीज काेसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. 


अकाेला : नदीकाठाजवळ शेतातील पिके पाण्याखाली गेली असून, अनेक शेतात एक ते दाेन फूटपर्यंत पाणी साचले अाहे. मूर्तिजापूर तालुक्यात अातापर्यंत सर्वाधिक ८३०.२ मि.मी. पाऊस पडल्याची नाेंद मंगळवारी करण्यात अाली. 


अमरावती : जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात रात्रीपासून सर्वत्र हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. चिखलदरा व धारणी तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. अमरावती शहरात गेल्या १८ तासात २२.८ मि.मी.पाऊस नोंदविण्यात आला. 


बुलडाणा : नदी, नाल्यांना पुर आल्यामुळे जिल्ह्यातील अंत्री देशमुख या गावचा संपर्क तुटला. 

 

नागपूर शहर तसेच जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार लागली होती. परिणामी जिल्ह्यातील मौदा तालुक्यात "सांड' आणि "सूर' नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सांड नदीशेजारील तारसा गावात पुराचे पाणी शिरले आहे. तर, तारसा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या वस्तीमध्ये देखील कमरेपर्यंत पाणी आले. मुख्य बाजारपेठेतही अनेक दुकानांत पाणी शिरले आहे. मौदा तालुक्यात अरोली येथे सूर नदीचे पाणी नदीकाठच्या घरात शिरल्याने नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोदामेंढी, शिवडोवली या गावांमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

आसोला मेंढा तलाव ओव्हर फ्लो
मागील चार दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने सावली तालुक्यातील ब्रिटिशकालीन आसोला मेंढा तलाव ओवर फ्लो झाला आहे. सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी इथे मोठी गर्दी केली आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्याने गोसीखुर्द धरणाचे पाणी या तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गही आनंदात आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह इतरही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहे. तलावाच्या चारही बाजूने जंगलाचा वेढा आहे. या जंगलातील विविध पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

 

भंडारा जिल्ह्यात पावसाचे तांडव
भंडारा जिल्ह्यात सोमवारपासून पावसाने तांडव सुरु केले आहे. सोमवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. कधी रिमझिम कधी मुसळधार पाऊस येत होता. मात्र सायंकाळी 7 नंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या मध्ये सर्वात जास्त लाखनी तालुक्यात 185 मिमी, भंडारा तालुक्यात 154, मोहाडी तालुक्यात 116, तुमसर 98, साकोली तालुक्यात 90, लाखांदूर, 78 आणि पवनी तालुक्यात 74 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे एकूण 113.8 मिमी पाऊस काल पासून बरसला आहे.

 

एकाच घरातील तिघांचा मृत्यू
भंडारा तालुक्याच्या राजेदहेगावतील खंडाते कुटुंबीयांचे कौलारू घर पावसामुळे अंगावर कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतकामध्ये 32 वर्षीय सुकरू खंडाते, 28 वर्षीय सारिका खंडाते व 3 वर्षीय सुकन्या खंडाते यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुरमाडी गावातील सुदाम टेकाम याचा शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसल्याने मृत्यू झाला.    

 

गोसे धरणाचे 33 दरवाजे 1 मीटरने उघडले
या अतिवृष्टी नंतर मध्य प्रदेशातून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात वाढ होत असल्यामुळे गोसे धरणाचे 33 दरवाजे 1 मीटरने  उघडण्यात आले आहेत. या मधून 244309 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाची पातळी 244 मीटर आहे तर धरणात आज 248 मीटर इतका साठा आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. या मुळे सुरेवाडा- खमारी रस्त्याच्या नाल्यावरून पाणी वाहत असलंयाने रस्ता बंद आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला सुट्टी जाहीर केली आहे.

 

गडचिरोलीत दोघांची सहीसलामत सुटका
गडचिरोली जिल्ह्यात नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. गडचिरोलीपासून 10 किलोमीटर अंतरावरील गुरवळा गावानजीक ही घटना घडली. गडचिरोली येथील निखिल सत्यनारायण चेरकरी (27) व देवदत्त शरद धारणे (26) हे दोन युवक सोमवारी भल्या पहाटे कारने गुरवळा गावाकडे जात होते. मात्र, गावाच्या आधी शिवमंदिराच्या अलिकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता. त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताच कार वाहून जाऊ लागली. यावेळी दोघेही कसेबसे बाहेर निघाले. एक जण कारच्या छतावर चढला, तर दुसरा झाडावर चढला. सकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास माहिती मिळताच रेस्क्यू टिमने दोघांनाही ट्यूब व दोराच्या साह्याने सुखरुप बाहेर काढले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पावसाने कहर केल्या पूर्व विदर्भातील फोटो...

 


Loading...

Recommended


Loading...