Loading...

मोबाइल कंपनीने ग्राहकाला पाच लाख द्यावे, ग्राहक न्यायमंचाची कारवाई

ग्राहकाला योग्य सेवा न पुरवल्याबद्दल मोबाइल सेवा पुरवणार्‍या कंपनीने ग्राहकाला पाच लाख रुपये द्यावे, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक न्यायमंचने दिला आहे.

Divya Marathi Sep 19, 2013, 07:12 IST

ठाणे - ग्राहकाला योग्य सेवा न पुरवल्याबद्दल मोबाइल सेवा पुरवणार्‍या कंपनीने ग्राहकाला पाच लाख रुपये द्यावे, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक न्यायमंचने दिला आहे.

लूप मोबाइल कंपनीने कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता एका ग्राहकाला दुसर्‍या ग्राहकाच्या नावाचे डुप्लिकेट सीम कार्ड अदा केले. त्यामुळे या ग्राहकाच्या खात्यातून पाच लाख रुपये डुप्लिकेट सीमधारकाने मोबाइल बँकिंगद्वारे काढले, असा ठपका ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाने   (टीडीसीआरएफ) ठेवला आहे.

मालाड येथील रहिवासी बेनीप्रसाद राका हे ठाणे जिल्ह्यात नोकरीस आहेत. त्यांनी 2009 मध्ये लूप मोबाइल गॅलरीमधून सीम कार्ड विकत घेतले होते. सुरुवातीस सीम व्यवस्थित सुरू होते. मात्र, फेब्रुवारी 2011 मध्ये हे सीम काम करेनासे झाले. राका यांनी मोबाइल गॅलरीमध्ये जाऊन सीम काम करत नसल्याचे सांगितले. त्यांना माहिमच्या लूप कार्यालयात जाण्यास सांगितले. चुकीने कनेक्शन बंद झाले असेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत फोन सुरू झाला. त्याच महिन्यात त्यांना कंपनीच्या चेंबूर गॅलरीकडून कॉल आला की, एका व्यक्तीने कंपनीशी संपर्क साधला आहे. त्याने नवीन क्रमांक मिळावा यासाठी अर्ज केला आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार आपण नवीन क्रमांक मिळण्यासाठी अर्ज केला नाही तसेच ज्याने अर्ज केला त्याची मागणी प्रतीक्षेत ठेवायला हवी होती.

दरम्यान, पासवर्डच्या विचारणेविषयी बँकेकडून राका यांना एसएमएस आला, प्रत्यक्षात याबाबत कुठलीही विनंती आपण बँकेला केलेली नव्हती. त्यांच्या लक्षात आले की, आपले बँक विवरण हॅक झाले आहे. ज्या माणसाला डुप्लिकेट सीम कार्ड इश्यू केले आहे, त्यानेच खात्यातून पाच लाख रुपये काढले असावेत, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यानंतर राका यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली तसेच ग्राहक संरक्षण मंचाकडेही त्यांनी धाव घेतली. राका यांनी म्हटले, मोबाइल कंपनीच्या माहिम कार्यालयाने डुप्लिकेट सीम इश्यू करताना कुठलीही शहानिशा केली नाही.

यामध्ये दोष सेवाधारकांचाच आहे. ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष उमेश झावळीकर, सदस्य एन. डी. कदम यांनी प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले, ठाणे गॅलरी ग्राहकाला योग्य सेवा प्रदान करण्यात अपयशी ठरली आहे. याचा फटका ग्राहकाला बसला असून, पाच लाख रुपये त्याला गमवावे लागले. तीन महिन्यांत ही राशी 10.60 टक्के व्याजदराने फेब्रुवारी 2011 पासून ग्राहकाला द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.


Loading...

Recommended


Loading...