Loading...

जबाबदारीने वागा...

तुम्ही कॉलेजात पदार्पण करता, तेव्हापासून फारशी बंधने लादली जाणार नाहीत. बरीच स्वतंत्रता तुम्हाला मिळणार आहे. बरेचसे निर्णय तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत. सुरुवातीला तुम्ही जे काही निर्णय घ्याल, त्यावर तुमचे करिअर, तुमचे उर्वरित आयुष्यही अवलंबून राहणार आहे. याची जाणीव असू द्या.

Divya Marathi Jun 17, 2015, 01:28 IST
एज्यु कॉर्नर (महाविद्यालय प्रवेश व स्वातंत्र्य) तुम्ही कॉलेजात पदार्पण करता, तेव्हापासून फारशी बंधने लादली जाणार नाहीत. बरीच स्वतंत्रता तुम्हाला मिळणार आहे. बरेचसे निर्णय तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत. सुरुवातीला तुम्ही जे काही निर्णय घ्याल, त्यावर तुमचे करिअर, तुमचे उर्वरित आयुष्यही अवलंबून राहणार आहे. याची जाणीव असू द्या.   अभ्यासाचे वातावरण
मागील लेखात, कॉलेज आयुष्यात पदार्पण करण्याबाबत काही मार्गदर्शक टिप्स आपण पाहिल्या. उर्वरित मार्गदर्शक गोष्टी आपण आज पाहू. शाळेत असताना शिक्षक तुम्हाला विविध विषयांची माहिती पुरवायचे, नोट्स पुरवायचे, तुम्ही जे शिक्षकांकडून शिकला आहात, आणि जे नोट्स तुम्हाला पुरवले आहेत फक्त आणि फक्त त्यावरच तुमची परीक्षा घेतली जायची. तुमच्या अभ्यासाकडे, वर्गातल्या वागण्याकडे शिक्षक बारकाईने लक्ष ठेवत. परंतु कॉलेजमध्ये असे काही नसणार आहे. घरी करायला दिलेला अभ्यास जर तुम्ही केला नाही किंवा वर्गात तुमचे लक्ष नसते म्हणून तुमच्या पालकांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली जाणार नाही. कारण यापुढे तुमच्याकडे एक जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिले जाणार आहे. त्याचबरोबर इथून पुढे तुम्हा स्वत:लाच प्रोफेसरांनी शिकवलेल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊन पद्धतशीर नोटस बनवायच्या आहेत. Read, Read & Read. कॉलेजमधील पाठ्यपुस्तक ही शाळेच्या पुस्तकांपेक्षा बरीच महाग असतात. तेव्हा कपाटात फक्त त्याचा संग्रह करून ठेवू नका. शाळेत तुम्ही पूर्ण पुस्तक फार कमी वेळा वाचले असेल कारण शिक्षकांकडून तयार प्रश्न उत्तरे तुम्हाला मिळाली. परंतु आता तुम्हाला जास्तीत जास्त वेळा पुस्तके वाचून त्यातले ज्ञान आत्मसात करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे.

आराखडा तयार करा
शाळेत असताना घरचा अभ्यास, वेगवेगळे प्रोजेक्टस  वेळेत पूर्ण व्हावे याकरिता तुमचे शिक्षक तुम्हाला काटेकोर मार्गदर्शन करत होते. सहकार्य करत होते. कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा संपूर्ण सेमिस्टरचे असाइन्मेंट एकाच वेळी सुरुवातीला जाहीर केले जातात. प्रत्येक असाइन्मेंटची तारीख निश्चित केलेली असते आणि तुम्ही त्या वेळेत पूर्ण करून द्याल, अशी अपेक्षा असते. तेव्हा त्या वेळेत पूर्ण कशा होतील याकडे तुमचा कल असू द्या. भित्तिपत्रक बनवून त्यावर प्रत्येक असाइन्मेंट द्यायची तारीख लिहून ठेवा की जेणेकरून ते सदैव तुमच्या स्मरणात राहील व शेवटच्या क्षणी तुमची अनावश्यक तारांबळ उडणार नाही. सुरुवातीलाच प्रोफेसर्स तुम्हाला अभ्यासक्रम व परीक्षा याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतात. परीक्षा कशा प्रकारच्या असतात, तुमच्याकडून परीक्षेत काय अपेक्षित असते, परीक्षेमार्फत केली जाणारी चाचपणी ही संपूर्ण माहिती सुरुवातीलाच करून घ्या आणि त्यावर आधारित तुमची अभ्यासाची पद्धत असू द्या. कारण इथून पुढे तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत बरेच बदल करावे लागणार आहेत. कोणत्याही बाबतीत काही गोंधळ असेल, समजले नसेल तर नि:संकोचपणे प्रोफेर्ससना भेटून त्या समजावून घ्या. (Smit.kelkar@gmail.com)

Loading...

Recommended


Loading...