Loading...

शोधकथांची रोमांचक सफर

रहस्यकथांचे दालन ही नेहमीच वाचकांसाठी आवडीची बाब असते. जगातील अनेक भाषांमध्ये रहस्यकथांना उत्तम वाचक मिळत आले आहेत.

Divya Marathi Apr 07, 2017, 03:05 IST
रहस्यकथांचे दालन ही नेहमीच वाचकांसाठी आवडीची बाब असते. जगातील अनेक भाषांमध्ये रहस्यकथांना उत्तम वाचक मिळत आले आहेत. भारतीय भाषांमध्येही ही गोष्ट आढळते. बंगाली साहित्यात निर्माण झालेली आणि कालांतराने इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवादित झालेल्या ‘व्योमकेश बक्षी’ ही रहस्यकथांची मालिकाही अशीच वाचकप्रिय ठरली आहे. २०११ साली रोहन प्रकाशनतर्फे व्योमकेश बक्षी मराठीमध्ये अनुवादित झाले होते आणि त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक अशोक जैन यांनी ओघवत्या शैलीत हा अनुवाद केला होता. मध्यंतरी जैन यांचे निधन झाले. जैन यांच्या पत्नी सुनीती यांनी अशोक जैन यांच्या अनुवादप्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग घेतला होता. या पार्श्वभूमीवर जैन यांच्या निधनानंतर व्योमकेश बक्षी रहस्यकथांचा नवा भाग सुनीती जैन यांनी अनुवादिक केला असून, नुकताच तो वाचकांना उपलब्ध झाला आहे. चौथ्या भागात एकूण सात रहस्यकथांचा समावेश आहे. रक्तमुखी नीलम, खानदानी हिऱ्याची चोरी, एका सूडाची कथा, लाल कोटातील तो माणूस, भुताच्या रूपातील अशील, लुप्त झालेल्या शिक्षकाचे रहस्य आणि खोली क्रमांक २ अशा व्योमकेशकथा या नव्या अनुवादात आहेत. मूळ कथांमधील बंगाली वातावरण समजून घेताना या कथा १९३२ ते १९६७ या काळात लिहिल्या गेल्या आहेत, याचे भान राखणे आवश्यक आहे. मात्र वरवर अशक्यप्राय वाटणाऱ्या गूढाची उकल केवळ बुद्धिचातुर्य, तर्कसंगत विचार, समस्येकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन याद्वारे करणाऱ्या व्योमकेशविषयी एक हळवा कोपरा वाचकाच्या मनात निर्माण करण्यात हा अनुवाद यशस्वी होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या कथांमध्ये आहे.

Loading...

Recommended


Loading...