Loading...

तेजस्वी स्फूर्तीदेवतेचा जीवनपट

छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब एवढीच जिजाऊसाहेबांची ओळख मर्यादित नाही..स्वातंत्र्याचा खरा अर्थ नेमका उमगलेले,

Divya Marathi Jun 23, 2017, 03:06 IST
 छत्रपती शिवरायांच्या  आईसाहेब एवढीच जिजाऊसाहेबांची ओळख मर्यादित नाही..स्वातंत्र्याचा खरा अर्थ नेमका उमगलेले, भरकटलेल्या तरुणाईला, पोरपणाला योग्य दिशा दाखवणारे, त्या वाटेवरची पहिली पावले टाकण्यास साह्य करणारे, सतत प्रेरणा देणारे, जागृत ठेवणारे आणि प्रत्येकावर मायेची पाखर घालणारे विश्वव्यापी ‘आईपण’ जिजाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वात सामावले होते. वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता..आणि या सगळ्यापलीकडे एक मनस्विनी स्त्री, असे जिजाऊसाहेबांचे अद्वितीय चरित्र कादंबरीसारख्या ललितकृतीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, सायली गोडबोले जोशी यांनी. ‘जिजाऊ – शोध आणि बोध’ या शीर्षकाची ही कादंबरी १७ जून रोजी वाचकांच्या भेटीस अाली.. त्यानिमित्ताने..   छत्रपती शिवाजी महाराजांवर विपुल लेखन उपलब्ध आहे.  मात्र छत्रपती शिवरायांना सर्वार्थाने घडवणारे, प्रेरणा देणारे, आधार देणारे जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व  मात्र इतिहासाच्या पानांतून फारसे डोकावताना दिसत नाही. युवा लेखिका सायली गोडबोले जोशी यांनी इतिहासाच्या आणि कागदपत्रांच्या साधनांतू्न अप्रकट राहिलेल्या जिजाऊंचे व्यक्तिमत्व  कादंबरीसारख्या  ललितकृतीतून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न ‘जिजाऊ – शोध आणि बोध’ द्वारा केला आहे.    जन्मापासूनच अत्यंत करारी, तेजस्वी, बाणेदार आणि जिद्दी स्वभावाच्या जिजाऊ नवसाने प्राप्त झालेले कन्यारत्न होते. शहाजीराजांशी विवाह झाल्यावर त्या भोसले घराण्याच्या स्नुषा बनल्या. तेव्हाची सामाजिक, राजकीय परिस्थिती मराठी समाजाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल होती. परकीय सत्ताधीशांच्या  पदरी महापराक्रमी मराठी सरदार चाकरी करत होते.    पाच शाह्या राजकीय वर्चस्वासाठी आपसांत सतत संघर्ष करत होत्या. युद्ध पाजवीला पुजले होते. परकीय सत्ताधीशांच्या  जुलमी, अन्यायी, अत्याचारी राजवटीचा वरवंटा मराठी जनता सोसत होती. हे सारे चित्र, हा भोवताल, त्यामागची कारणे यांची सजग जाण जिजाऊंपाशी होती. 
शहाजीराजे जरी परकीय सत्तेची चाकरी करत असले तरी स्वतंत्र राज्याची उर्मी त्यांच्याही  मनात होतीच, हे जिजाऊ जाणून होत्या. दुर्दैवाने शहाजीराजांनी त्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. तरीही शहाजीराजांनी दक्षिणेकडील तत्कालीन हिंदु राज्ये, सरदार यांना पराभूत न करता, सामोपचाराने व धोरणीपणाने टिकवून ठेवण्याचा मुत्सद्दीपणा अखेरपर्यंत ठेवल्याने  रायगड हातातून गेला तरी मराठे दक्षिणेकडे जिंजीतून संघर्ष करू शकले. 
अर्थात हा उत्तरार्ध झाला. शहाजीराजांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, पण स्वातंत्र्याची ज्योत आणि उर्मी जिजाऊंनी आपल्या पुत्राच्या शिवरायांच्या  मनात अशी जागवली, की त्याची परिणती स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात छत्रपतींच्या रूपाने झाली.   हा इतिहास खऱ्या अर्थाने घडवला तो जिजाऊ मासेहबांनी...तो प्रकट झाला शिवरायांच्या हातून..पण त्याची प्रेरणा, स्फूर्ती आणि त्यासाठीचा आधार मासाहेबांचाच होता.
सायली गोडबोले यांनी जिजाऊंचे हे तेजस्वी, बाणेदार, धोरणी, मुत्सद्दी, पराक्रमी व्यक्तिमत्व  नेमकेपणाने या कादंबरीत चित्रित केले आहे. सुमारे ६०० पृष्ठांची ही महाकादंबरीच  म्हणावी लागेल. पुरेशी साधने उपलब्ध नसतानाही लेखिकेने आपल्या प्रतिभेने, ज्ञानाने आणि तर्कसंगत मांडणीने जिजाऊंचे हे भव्य दिव्य चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.    या कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तरार्धात जिजाऊंशी संबंधित उपलब्ध असलेल्या  ऐतिहासिक पत्रांची नोंद लेखिकेने दस्तऐवज या परिशिष्टात घेतली आहे. तसेच परिशिष्ट २ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र, शिवकाळाची पार्श्वभूमी, यादवकाळ, बहमनी सत्तेच्या विभाजनातून निर्माण झालेल्या पाच शाह्या, मराठ्यांचा उदय, परकीय सत्ता, जातिव्यवस्था, महाराष्ट्राच्या गावगाड्यातील वतनदारी व्यवस्था, त्यात पाटील, कुलकर्णी, चौगुले, शेटे, महाजन, देशमुख, देशपांडे, मिरासदार, बलुतेदार यांची मोलाची माहिती दिली आहे. इस्लामी  सत्तेचा तत्कालीन समाजावर पडलेला परिणाम तसेच संतांचे कार्य यांचेही अभ्यासपूर्ण चिंतन लेखिकेने मांडले आहे.
जिजाऊंबद्दल कवी जयराम पिंड्ये, पं. गागाभट्ट तसेच पुढ्च्या काळात न्यायमूर्ती रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदींनी मांडलेले विचारही दिले आहेत. परिश्रमपूर्व तयार केलेला जिजाऊंचा कालपटही लेखिकेने दिला आहे.
 पुण्यश्लोक जिजाऊंसाहेबांच्या ३४३ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘अस्मी प्रकाशना’च्या वतीने ही कादंबरी प्रकाशित करण्यात अाली आहे. मराठी वाचक या साहित्यकृतीचे स्वागत 
करतील, असा विश्वास लेखिका गोडबोले यांनी व्यक्त केला आहे.   पूर्वार्ध अाणि उत्तरार्ध
जिजाऊ – शोध आणि बोध या साहित्यकृतीचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. पूर्वार्धात जिजाऊंच्या जन्मपूर्वकाळापासून मृत्यूपर्यंतचा भाग आहे. उत्तरार्धात ऐतिहासिक कागदपत्रे, उपसंहार, भोसल्यांची वंशावळ, राजमातेविषयी मान्यवरांनी काढलेले गौरवोद्गार असा भाग आहे. काही ऐतिहासिक शब्दांचे अर्थ, परिभाषा तसेच जिजाऊसाहेबांचा आयुष्यपट यांचाही समावेश उत्तरार्धात आहे.   jayubokil@gmail.com

Loading...

Recommended


Loading...