आता भारतातही ताशी 300 कि.मी. वेगाने धावणारी रेल्वे तयार होते आहे, असे कोणी सांगितले तर तुम्हाला आपली कोणी थट्टा करत नाही ना, असेच वाटेल. पण हे खरे आहे. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रकारचा प्रकल्प अहवाल बनवला आहे. या अहवालाच्या मसुद्यात असे अनेक मार्ग निवडण्यात आले आहेत की, ज्यावरून ताशी 300 कि.मी. वेगाने रेल्वे धावू शकणार आहे. सूत्रांच्या मते, संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनातच यासंबंधीचे विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे. माहिती अशी आहे की, सध्यातरी या विधेयकाचा मसुदा कायदा मंत्रालय, नागरी विकास मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि योजना आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. कारण या पूर्ण प्रकल्पासाठी या विविध मंत्रालयाचा सल्ला घेणे जरुरी आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतात अति वेगवान रेल्वे चालवण्यास खास डेडिकेटेड कॉरिडॉर बनवण्याची गरज पडणार आहे. अशा कॉरिडॉरच्या एक किलोमीटरसाठी जवळपास शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे. अशा स्थितीत या विधेयकाचा मसुदा संसदेत सादर करण्यापूर्वी संबंधित मंत्रालयाचा सल्ला जाणून घेणे महत्त्वाचे आहे.