Loading...

चीनचा नवीन फतवा: भर रस्त्यावर कापले जाताहेत मुस्लिम महिलांचे कपडे, शॉर्ट ड्रेस Compulsary

मुस्लिमांच्या विरोधात विचित्र फतवे काढण्यासाठी कुप्रसिद्ध चीन सरकार आता भर रस्त्यावर मुस्लिम महिलांचे कपडे कापत आहे.

Divya Marathi Jul 16, 2018, 11:30 IST

शिनजियांग - विघुर मुस्लिम समुदायाच्या विरोधात विचित्र फतवे काढण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चीन सरकार आता भर रस्त्यावर मुस्लिम महिलांचे कपडे कापत आहे. यासाठी सरकारने महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांचे काम इतकेच की हातात कात्री घेऊन मुस्लिम महिलांनी काय घातले ते पाहायचे. त्यांचा कुडता लांब दिसताच तो त्या कात्रीने भर रस्त्यावर कापायचा. चीनच्या नवीन फतव्यानुसार, महिलांनी फक्त शॉर्ट कपडे घालावे. त्यांचा कुडता थोडासाही लांब दिसून नये. अन्यथा तो भर रस्त्यावर कात्रीने कापला जाईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, चीनने यापूर्वीही मुस्लिमांना रमझान महिन्यात रोझे ठेवण्यावर बंदी लादली होती. सोबतच, येथील मुस्लिम दाढी वाढवू शकत नाहीत. मुस्लिम दिसेल असा कुठलाही पेहराव करू शकत नाहीत. एवढेच नव्हे, तर नमाजवर सुद्धा यापूर्वीच बंदी लादण्यात आली आहे. 


रस्त्यावर कपडे कापण्याचे काम पोलिसांना
पूर्व तुर्कस्तान म्हणूनही ओळखल्या जाणारा मुस्लिम बहुल प्रांत शिनजियांगमध्ये हा फरमान काढण्यात आला आहे. चीन सरकारने मुस्लिमांनी कसे कपडे घालावे याची लांब यादी जारी केली. त्यानुसार, मुस्लिम महिलांनी अंगभर कपडे घालू नये. कुडता सुद्धा गुडघ्यापर्यंत घातल्यास कारवाई केली जाईल. रस्त्यावर तैनात पोलिस त्या महिलांचे कपडे कात्रीने कापतील. मुस्लिम महिला नेहमीच अंगभर आणि लांब कपडे घालतात अशी सरकारची तक्रार आहे. या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.


ड्रोनने केली जाते हेरगिरी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिनजियांग प्रांतात मुस्लिमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ड्रोन तैनात केले आहेत. शाळेत जाणाऱ्या कुठल्याही मुस्लिम विद्यार्थ्याला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही. ड्रोनने त्या सर्वांची हेरगिरी करून वेळोवेळी विघुरांना अटक केली जाते. 


डुकराचे मांस खाण्यासाठी करतात मजबूर
मुस्लिम काउंसिल ऑफ हाँगकाँगच्या रिपोर्टनुसार, रमझानमध्ये मुस्लिमांना रोझा ठेवू दिले जात नाही. महिलांना बुरखा, नकाब आणि पदर सुद्धा घेऊ देत नाहीत. पुरुषांना दाढी आणि मुस्लिम पेहराव घालता येत नाही. मुस्लिमांत डुकर निषिद्ध आहे. मात्र, त्याच मुस्लिमांना सरकार डुकराचे मांस खाण्यासाठी मजबूर करत आहे. एवढेच नव्हे, तर मशीदींमध्ये मुस्लिमांना बळजबरी सैन्याचा वापर करून विचित्र घोषणा करायला लावतात. त्यामध्ये मुस्लिमांना मिळणारा अन्न, वस्त्र निवारा अल्लाह नाही तर चीन सरकार देत आहे असे बोलण्यास भाग पाडले जाते. मुस्लिम तरुणींचा विवाह बळजबरी चिनी युवकांशी लावून दिला जात आहे. विघुर मुस्लिमांचे अस्तित्व नष्ट व्हावे हा यामागे चीनचा हेतू आहे.


एवढा अत्याचार का?
- चीनच्या शिनजियांग प्रांतात ईस्ट तुर्कस्तान नव्हता. 1949 मध्ये चीनने बळकावून आपल्या देशात घेतला आणि त्यावर नियंत्रण मिळवले. ईस्ट तुर्कस्तान मुस्लिम (विघुर) बहुल होता. चीनमध्ये येणे त्यांना कदापी मान्य नव्हते. यानंतर काही विघुरांनी बंडखोर संघटना स्थापित करून बंड पुकारला. 
- चीनने हा बंड दाबण्यासाठी 1950 पासून 1970 पर्यंत आपल्या देशातील सर्वात उच्च वर्णीय मानला जाणारा हान समुदाय या प्रांतात स्थलांतरित करण्यास सुरुवात केली. ईस्ट तुर्कस्तानमध्ये सर्वच मोक्याचे ठिकाण हान समुदायाच्या ताब्यात देऊन मोठ-मोठ्या इमारती बांधण्यात आल्या. तसेच विघुरांना झोपडपट्टीत पाठवण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत हा वाद सुरूच आहे. 
- हान समुदायाला चीन सरकारचे पाठबळ आहे. तर विघुरांना अधिकाधिक दाबण्यासाठी नेहमीच नव-नवीन फतवे काढले जातात. त्याचेच पडसाद म्हणून जुलै 2009 मध्ये या प्रांतात सर्वात मोठी दंगल घडली होती. त्यामध्ये किमान 200 जण मारले गेले. 1721 जण जखमी झाले आणि 1500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती.


Loading...

Recommended


Loading...