Loading...

जनुकांवर ठरते पाल्यांची शाळेतील ७०% कामगिरी

शाळेत मुलाला चांगले गुण मिळत नसतील तर कदाचित ही आनुवंशिक समस्या असू शकते.

Divya Marathi Sep 11, 2018, 07:17 IST

लंडन- शाळेत मुलाला चांगले गुण मिळत नसतील तर कदाचित ही आनुवंशिक समस्या असू शकते. पाल्यांची ७०% पर्यंत शाळेतील कामगिरी त्यांना आई-वडिलांकडून मिळणाऱ्या जनुकानुसार (जीन्स) निश्चित होते. उर्वरित ३०% कामगिरी मेहनत आणि जवळपासच्या लोकांवर अवलंबून असते, असा निष्कर्ष लंडनच्या किंग्ज महाविद्यालयाने केलेल्या संशोधनातून समोर आला आहे. 


किंग्ज महाविद्यालयाने जुळ्या मुलांची शाळेतील कामगिरी या विषयावर संशोधन केले. यासाठी त्यांनी ६ हजार जुळ्यांचा म्हणजेच १२ हजार मुलांचा अभ्यास केला. यात मुलांच्या कामगिरीचा संबंध हा जनुकाशी असल्याचे अभ्यासातून आढळले. याच आधारावर त्यांनी नवीन संशोधनही केले. प्राथमिक स्तरावरून महाविद्यालयात येईपर्यंत मुलांचे कौशल्य कुठे वाढते तर कुठे कमी होते. ही सर्व प्रक्रिया जनुकांवर निश्चित होत असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या गुणांवरही दिसून येतो. आई-वडील किती शिक्षित आहेत यावर सर्व गोष्टी ठरत नसून त्यांच्याकडे कुठले कौशल्य आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. 


आई-वडील कमी शिकलेले असले आणि त्यांच्याकडे उत्तम कौशल्य असेल तर कदाचित मुलगाही शाळेत चांगली कामगिरी करू शकतो. या संशोधनाला जेनोम वाइड असोसिएशन स्टडी असे नाव देण्यात आले. या अभ्यासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, कालानुक्रमे मुलांच्या कामगिरीवर जनुकांचा परिणाम वाढत जातो. प्राथमिक स्तरावर हा परिणाम ४ ते १०% पर्यंत असतो. माध्यमिक शाळेत तो वाढतून ३० ते ४०% आणि महाविद्यालयात तो ७०% पर्यंत जाणवतो. संशोधनात याला ‘पॉलिजेनिक स्कोर’ हे नाव देण्यात आले.


गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यातही जनुकांची भूमिका
एखाद्या व्यक्तीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यामागेही जनुकांची भूमिका असल्याचे संशोधनातून समोर आले. ही बाब सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी अमेरिकेतील २०१२ मध्ये झालेल्या एका खुनाचा उल्लेख केला आहे. वॉल्ड्रप नावाच्या या व्यक्तीने त्याची पत्नी आणि मित्राचा खुन केला होता. प्रकरण कोर्टात गेले. त्यावेळी वकीलांनी त्याच्या शरीरात मोनोअमीन ऑक्सिडेस-ए हे जनुक असल्याचे म्हटले. यामुळे एखादा व्यक्ती  स्वत:हून खूप आक्रामक होत असतो. म्हणजेच वॉल्ड्रपने ठरवून या हत्या केल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्यातील जनुकांमुळे त्याला हे करणे भाग पडले. त्यामुळे या घटनेत त्याला कडक शिक्षा दिली जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयात दीर्घकाळ हा खटला चालला. वॉल्ड्रपची बाजू समजून घेत त्याच्या शिक्षेत घट करण्यात आली होती.


Loading...

Recommended


Loading...